पुणे : वाल्हे परिसरात बाजरीचा पेरा घटला | पुढारी

पुणे : वाल्हे परिसरात बाजरीचा पेरा घटला

वाल्हे, समीर भुजबळ : या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात पडला नसल्याने,जून, जुलै महिन्यात रिमझिम पाऊस पडल्याने भविष्यात वाल्हे परिसराला पाण्याची टंचाई जाणवणार आहे. शेतकरी चिंताग्रस्त होत असून, खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात झाल्या आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना होती. परंतु, जून महिना संपूर्ण, जुलै अर्धा संपला, तरीही रिमझिम पाऊस सोडून मोठा पाऊस पडला नसल्याने, अनेकांनी खरीप हंगामातील पिकांकडे विषेशत: बाजरीच्या पेरणीकडे पाठ फिरविली आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार्‍या बाजरीच्या खुरपण्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी दिसत आहे. बाजरीचा पेरा कमी झाल्याने शेतकर्‍यांचे पूर्ण गणितच बिघडलेले आहे.

मागील वर्षी वाल्हे परिसरामध्ये 1124 हेक्टर क्षेत्रामध्ये बाजरीची पेरणी केली होती. मात्र, या वर्षी 6 ऑगस्ट पर्यंत 677 हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली आहे. अनेक शेतकरी उसाची लागवड करावी की बाजरीजे उत्पन्न घ्यावे, या द्विधा मनःस्थितीत आहेत.
या वर्षी वाल्हे परिसरात बाजरीचा पेरा घटला आहे. चालू हंगामात फक्त 677 हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी 6 ऑगस्टअखेर बाजरीची पेरणी जवळपास 447 हेक्टरने कमी झाली आहे, अशी माहिती कृषी सहायक गीता पवार, मयूरी नेवसे यांनी दिली.

चालू वर्षी 6 ऑगस्ट 2022 अखेर फक्त 147 मिलिमीटर पाऊस पडला आहे, अशी माहिती वाल्हे महसूल विभागाकडून तलाठी नीलेश अवसरमोल यांनी दिली.

Back to top button