खेडला 31 गावांच्या पाणी योजना प्रगतिपथावर | पुढारी

खेडला 31 गावांच्या पाणी योजना प्रगतिपथावर

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक घरात पाण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत खेड तालुक्यातील 31 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. काही कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली, तर काही कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए. बी. चाटे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून 2024 पर्यंत प्रत्येक गावाला नळ पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक घरात नळाने पाणी पोहचविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू केले आहे.

खेड तालुक्यातील 186 गावांंसह वाड्या-वस्त्यांवरील पाणीपुरवठा योजनांचे आराखडे पूर्ण झाले आहेत. पाच कोटींपेक्षा जास्त निधीच्या 21 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत पूर्ण केल्या जाणार आहेत, तर 165 नळ पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत राबविणार आहे. 186 पैकी 31 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांचा कार्यारंभ आदेश काढल्याची माहिती अभियंता ए. बी. चाटे यांनी दिली. कार्यारंभ आदेश 17 नोव्हेंबर 2021 पासून टप्प्याटप्प्याने 18 जुलै 2022 पर्यंत देण्यात आला. कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीला सहा महिने ते दीड वर्षाची मुदत दिली आहे.

मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेची गावे व कंसात अंदाजपत्रकी रक्कम
ढोरे भांबुरवाडी – जरेवाडी (1 कोटी 28 लाख), खरपुडी खुर्द (53 लाख 35 हजार), गाडकवाडी (65 13 ), कान्हेवाडी बु. (1 कोटी 32 लाख 7 हजार), मांजरेवाडी (64 लाख 32 हजार), सांडभोर वाडी (1 कोटी 10 लाख 75 हजार), राक्षेवाडी (98 लाख 22 हजार), बहुळ (1 कोटी 98 लाख 98 हजार), तळ्याची ठाकरवाडी (दोंदे) (1 कोटी 99 लाख 99 हजार), चिखलगाव (57 लाख 67 हजार), साबळेवाडी (59 लाख 32 हजार), वाळद (1 कोटी 15 लाख 36 हजार), गोसासी (1 कोटी 63 लाख 84 हजार), करंजविहिरे (63 लाख 94 हजार), गुळाणी (1 कोटी 49 लाख 98 हजार), कोये (3 कोटी 2 लाख 5 हजार), पापळवाडी (66 लाख 41 हजार), वडगाव पाटोळे (1 कोटी 62 लाख), बहिरवाडी (91 लाख 32 हजार), गोनवडी (21 लाख 37 हजार), भिवेगाव (भोरगिरी) (20 लाख 7 हजार), साबुर्डी (1 कोटी 28 लाख 42 हजार), खालुंब—े (4 कोटी 10 लाख 27 हजार).

21 गावांच्या योजनांचे आराखडे तयार
खेड तालुक्यातील पाच कोटींहून अधिक रकमेच्या नळ पाणीपुरवठा योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत आल्या आहेत. या योजनांचे आराखडे तयार झाले आहेत. मात्र, प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. यात निमगाव खंडोबा, दावडी, वरुडे, वाफगाव, कनेरसर, पूर, चिंचबाईवाडी, वाकळवाडी, जऊळके बु., निघोजे, म्हाळुंगे, खराबवाडी, काळूस, रासे, मरकळ, सोळू, चर्‍होली खु., गोलेगाव, पाईट, कडूस, किवळे या गावांचा समावेश आहे.

Back to top button