विद्यार्थ्यांना पदवीला मिळेना प्रवेश; विद्यापीठाने सीबीएसई, आयएससी विद्यार्थ्यांची सोय करण्याची मागणी | पुढारी

विद्यार्थ्यांना पदवीला मिळेना प्रवेश; विद्यापीठाने सीबीएसई, आयएससी विद्यार्थ्यांची सोय करण्याची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (आयएससी) बारावीच्या परीक्षेत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावरही विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी झगडावे लागत आहे. महाविद्यालयांनी मोजक्याच जागा विद्यार्थ्यांसाठी रिक्त ठेवल्याने, अनेकांचे नाव प्रतीक्षा यादीत झळकले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुण्यातील नामवंत महाविद्यालयांनी बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार, बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. मात्र, त्याचवेळी ‘सीबीएसई’ आणि ‘आयएससी’चा बारावीचा निकाल उशिराने जाहीर झाला. हा निकाल जाहीर होईपर्यंत, महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेर्‍या पूर्ण केल्या, तर तिसरी फेरी सुरू केली होती.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज सुरू केले. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी अर्जही भरले. मात्र, फारच कमी जागा रिक्त राहिल्याने, अनेकांना प्रवेशाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील ‘कट ऑफ’ गुणांपेक्षा अधिक गुण आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अडचणींना सामारे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

‘गरजू विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्या’
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन, गरजेनुसार महाविद्यालयांना वाढीव जागा द्याव्यात. या जागांवर गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना दिल्याचे अ‍ॅड. मंदार जोशी यांनी सांगितले. शिष्टमंडळात शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, डॉ. सिद्धार्थ धेंडे आदींचा समावेश

Back to top button