पिंपरी :  कंत्राटी डॉक्टर, कर्मचार्‍यांचा महिन्याचा पगार रखडला | पुढारी

पिंपरी :  कंत्राटी डॉक्टर, कर्मचार्‍यांचा महिन्याचा पगार रखडला

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालय आणि यमुनानगर येथील रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर काम करणारे डॉक्टर, कर्मचारी यांचा जून महिन्याचा पगार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. नवीन जिजामाता रुग्णालयात यापूर्वीही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कंत्राटी तत्त्वावर काम करणारे डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचा पगार झाला नव्हता. त्या वेळी संबंधित डॉक्टर व कर्मचार्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना पगार देण्यात आला होता.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिना सुरु झाल्यानंतरही कर्मचार्‍यांचा अद्याप जून महिन्यातीलच पगार देण्यात आलेला नाही. जिजामाता रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर जवळपास 125 जण काम करतात. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, वॉर्ड आया, एक्स-रे टेक्निशियन आदींचा समावेश आहे. यमुनानगर रुग्णालयातील कंत्राटी तत्त्वावरील डॉक्टर व कर्मचार्‍यांचा जून महिन्यातील पगार झालेला नाही. रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर 6 डॉक्टर, 12 ते 15 परिचारिका आणि 10 वॉर्डबॉय व आया काम करीत आहेत. यमुनानगर रुग्णालयातही यापूर्वी कंत्राटी डॉक्टर व कर्मचार्यांना उशिरा पगार मिळाला होता.

जानेवारी महिन्यात त्यांनी त्याच्या विरोधात आंदोलन केले होते. याबाबत विचारणा करण्यासाठी सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यमुनानगर रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फेरके यांना वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.

कंत्राटी तत्त्वावरील डॉक्टर व कर्मचार्‍यांचा पगार झाला नसेल तर त्याबाबत आम्ही महापालिका प्रशासनाला 10 तारखेला पत्र देतो. त्यानुसार जून महिन्यातील पगार न झाल्याबद्दल जुलै महिन्यात पत्र देण्यात आलेले आहे. त्याबाबत पुढील कार्यवाही महापालिका वैद्यकीय विभागामार्फत करण्यात येईल.
            – नासेर अल्वी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी

Back to top button