पुणे : फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणासह (म्हाडा) लाभार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी, बांधकाम व्यावसायिक भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज प्रकाश येवला (वय 35, रा. मानीक कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय शंकर ठाकुर (वय.43) यांनी फिर्याद दिली आहे.
मे 2019 मध्ये म्हाडाने काढलेल्या लॉटरीत भूमी कन्स्ट्रक्शनतर्फे पंकज येवला यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील भूमी ब्लेसिंग या प्रकल्पाचादेखील समावेश होता. येवला यांनी लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत रेरा कायद्याच्या तरतुदीनुसार बांधकाम पूर्ण करून ताबा देणे बंधनकारक होते. मात्र, येवला यांनी ताबा दिला नाही.

या कारणातून लाभार्थी एस. के. चकोर यांनी तक्रार अर्ज सादर केला. त्यानंतर म्हाडाने येवला यांच्या सोबत तत्काळ पत्रव्यवहार करून प्रकरण गांभीर्याने घेऊन बांधकाम पूर्ण करून लाभार्थ्यांना ताबा देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतरदेखील काही सुधारणा झाली नाही. त्यानंतर इतर लाभार्थ्यांनी याबाबत म्हाडाकडे तक्रारी केल्या होत्या. येवला यांच्यासोबत पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली. त्या वेळी त्यांनी 31 मार्च 2022 च्या अगोदर सर्व सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरदेखील येवला यांच्याकडून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आठ लाभार्थ्यांनी उपोषणास बसणार असल्याचे कळविले होते. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर म्हाडाने संबंधीत प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून गुन्हा दाखल केला आहे.

 

Back to top button