पुणे : ‘बळकावलेली’ सभागृहे पुन्हा पालिकेच्या ताब्यात | पुढारी

पुणे : ‘बळकावलेली’ सभागृहे पुन्हा पालिकेच्या ताब्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सर्वपक्षीय नगरसेवकांनी वॉर्डस्तरीय निधीतून बांधून बळकावलेली सभागृहे (हॉल) महापालिका प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यात शासकीय कार्यालये सुरू करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या विविध भागांत पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मिळकती सध्या पडून आहेत. या मिळकतीमधून महापालिकेस कोणतेही उत्पन्न मिळत नाही. या उलट काहीही वापर नसताना दरवर्षी त्या ठिकाणी, विद्युत, भवन, पाणीपुरवठा तसेच स्वच्छतागृहांच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे.

अशा मिळकतीची माहिती महापालिकेकडून संकलित करण्यात आली असून, या जागा भाडेकराराने देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत या जागा शासकीय संस्थांना भाडेकराराने देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड या संस्थांना काही जागा भाड्याने देण्यात आल्या आहेत.

तसेच महापालिकेकडे मुद्रांक शुल्क विभाग, सहकार विभाग, कृषी विभाग, पोस्ट ऑफिस, शासकीय बँकांकडून जागांची मागणी करण्यात आली असून, या विभागांना जागा देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीनुसारच या जागा देण्यात येणार असल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button