पुणे : श्रावणामुळे फुलबाजार गजबजला | पुढारी

पुणे : श्रावणामुळे फुलबाजार गजबजला

पुणे : सणांचा महिना असलेल्या श्रावणास सुरुवात झाल्याने शहरातील फुलबाजार गजबजू लागले आहेत. श्रावणात व्रतवैकल्ये व पूजा मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारात फुलांना मागणी वाढली आहे. परिणामी, फुलांच्या दरात तेजी आली असून, महात्मा फुले मंडईत 80 ते 100 रुपये किलो दराने मिक्स फुलांची विक्री सुरू आहे. श्रावणात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. याखेरीज सोमवारी तसेच शुक्रवारी पूजेसाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी राहते. त्या पार्श्वभूमीवर पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमााणावर फुलांची लागवड करतात. श्रावण महिन्यात फुलांना चांगले दर मिळत असल्याने शेतकरीवर्गही या काळात मोठ्या प्रमाणात फुले बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

सोमवारी महादेवाला अर्पण करण्यासाठी पांढरी शेवंती आणि गुलछडी या फुलांना, तर पूजेसाठी झेंडू, शेवंती, अष्टर, निशिगंध, गुलछडी या फुलांना मोठी मागणी होत आहे. फुलबाजारात श्रावणामुळे उत्साहाचे वातावरण आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला. बाजारात फुलांची आवक चांगली असली, तरी चांगल्या प्रतीच्या फुलांनाच चांगले दर मिळत आहेत. श्रावणानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत फुलांच्या मागणीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. पुढील तीन महिने फुलांना चांगली मागणी राहणार असून, दरही तेजीत राहतील, असे अखिल फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.

कर्नाटकातील आवक फक्त कागड्यापुरतीच मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात कर्नाटकातून फुलांची आवक चांगली होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील शेतकर्‍यांनी फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परराज्यांतील फुलांना मागणी कमी झाली आहे. कागडा फूल वगळता सर्व फुलांची आवक पुणे, सातारा, सोलापूरमधून होत असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील फुलांचे दर
फूल प्रतिकिलो
झेंडू 30 ते 60 रुपये
गुलछडी 80 ते 150 रुपये
शेवंती 60 ते 120 रुपये
डच गुलाब (20 नग) 50 ते 80 रुपये
जरबेरा 30 ते 50 रुपये
शेवंती काडी 80 ते 120 रुपये
कार्नेशियन 60 ते 80 रुपये

Back to top button