पुणे : ट्रेनी ग्रामसेवकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम | पुढारी

पुणे : ट्रेनी ग्रामसेवकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेतील ग्रामसेवकांसाठी फाउंडेशन कोर्सला संस्थेचा अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या शैक्षणिक परिषदेने ही मान्यता दिली आहे. एक आठवड्यापूर्वी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सहकार्यास मान्यता दिली होती. प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकांच्या शैक्षणिक आणि मूल्यमापनासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापक असतील. या दोन्ही संस्था संशोधन आणि दोन्ही संस्थांच्या परिसरातील सुविधांच्या वापरासाठी सहकार्य करणार आहेत.

मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था ही राज्यातील प्रशिक्षण क्षेत्रातील अकरा संस्थांपैकी एक असून, संस्थेंतर्गत पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील ग्रामीण विकास व्यावसायिकांचे प्रशिक्षण घेण्यात येते. केंद्र सरकारने 5 कोटी 29 लक्ष खर्चाच्या इमारत संकुलाला मंजुरी दिली असून, बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकार्‍यांसाठी सेवांतर्गत आणि पायाभूत अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी शासनाने या संस्थेला पुणे जिल्हा प्रशिक्षण संस्था घोषित केली आहे. संस्थेने गेल्या वर्षी विक्रमी 28 हजार व्यक्तींना पूर्णवेळ आणि अल्पकालीन अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत असणार्‍या सहकार्‍याचा त्यांनी ग्रामीण विकासासंदर्भात केलेले संशोधन, विकसित केलेल्या अध्यापन पद्धतीचा ग्रामसेवक प्रशिक्षणार्थी आणि इतर अधिकार्‍यांना लाभ होणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. व्यावसायिक आणि पूर्णवेळ प्राध्यापकांच्या मदतीने अभ्यासक्रमाची शैक्षणिक कठोरता सुधारण्यास आणि प्रशिक्षणार्थींचे योग्य मूल्यमापन सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.

ग्रामसेवक प्रशिक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दिवस आहे. उत्तम प्रशिक्षणासह, अद्ययावत अभ्यासक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा होईल. या यशाबद्दल मी ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन करतो. अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.

                             आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Back to top button