‘भिंतफोडे’ पोलिसांना भारी ! 2 दरोडा वाहन पथकांनाही तपास लागेना | पुढारी

‘भिंतफोडे’ पोलिसांना भारी ! 2 दरोडा वाहन पथकांनाही तपास लागेना

पुणे : तेहतीस पोलिस ठाणी… 13 विविध गुन्हे शाखेची पथके… त्यात दोन दरोडा वाहन चोरी विरोधी, दोन खंडणी आणि शहरभर कारवाईचे धडकसत्र राबविणारा सामाजिक सुरक्षा विभाग असा तगडा फौजफाटा असतानादेखील भगदाड पाडून घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास करणार्‍या टोळ्यांचा थांगपत्ता लागला नाही.

यात एक-एक गुन्ह्याची नव्याने भर पडत असून, सराफी दुकाने, मोबाईल दुकाने लक्ष्य करणारे चोरटे अद्याप मोकाट आहेत. चोरीच्या अशा पद्धतीचा वापर करणार्‍या नवीन टोळ्या तपास पथकांना आव्हान देत असून, अशा चोरट्यांचा बंदोबस्त होणार तरी केव्हा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कोंढव्यात चोरट्यांनी सराफी दुकानाची भिंत तोडून चोरी केल्याची घटना रविवारी (31 जुलै) घडली. यात सव्वापाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात मालमसिंह राठोड (वय 42) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंड्री चौकात न्यू खिमंडे ज्वेलर्स दुकान आहे. दुकानाची भिंत व शाळेची भिंत सामाईक आहे. यादरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री सामाईक भिंत तोडून दुकानात पाठीमागून प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील दागिने व रोकड असा एकूण 3 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत समल्यानंतर राठोड यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

शहरातील मोठी घरफोडीही नाही उघड
ऑगस्ट 2021 मध्ये कुटुंबासह बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात घरफोडी करून तब्बल 155 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडली होती. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून घरातील 155 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 88 लाख 38 हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरून नेला होता, हा प्रकार 9 ते 18 ऑगस्ट या कालावधीत पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी येथे घडला होता. विवेक वसंतराव चोरघडे (वय 47, रा. शेवाळवाडी, फुरसुंगी) यांच्या घरी हा प्रकार घडला होता. अद्यापही ही घरफोडी उघड होऊ शकली नाही.

चालू वर्षात 31 जुलैअखेर 355 घरफोड्या
शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल 355 घरफोड्यांच्या घटना दाखल झाल्या आहेत. हे प्रमाण मागील वर्षी 213 इतके होते. त्यात कमालीची वाढ झाली आहे. यावर्षी परिमंडळ एक मध्ये 17, परिमंडळ दोन मध्ये 47, परिमंडळ तीन मध्ये 64, परिमंडळ 4 मध्ये 83 तर परिमंडळ 124 घरफोडींच्या घटनांची नोंद झाली आहे. या घरफोडींच्या घटनांमध्ये लाखो कोट्यवधींचा ऐवज, मुद्देमाल चोरीला गेला आहे.

मार्च महिन्यात वारजेतील गणपती माथा येथील एका सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी केलेल्या चोरीत तब्बल एक कोटी 23 लाख 75 हजार रुपये किंमतीचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. ही घटना दुपारी अडीच ते पावणेपाचच्या सुमारास घडली होती. अतिशय नियोजनपूर्वक चोरट्यांनी शेजारचा गाळा भाड्याने घेऊन सराफी दुकान बंद झाल्यानंतर भिंतीला भगदाड पाडून ही चोरी केल्याचे समोर होते. आनंदकुमार वर्मा (वय 34, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दुकानाशेजारी पूर्वी बेकरी होती. अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत चोरट्यांचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही.

ड्रिलमशीनच्या साह्याने दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून चोरट्यांनी 52 लाख 30 हजार रुपये किमतीचे तब्बल तीनशे सात मोबाईल चोरी केले. अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने रेकी करून चोरट्यांनी ही चोरी केली होती. हा प्रकार सोमवारी पेठेतील खुराणा सेल्स नावाच्या मोबाईल शॉपीमध्ये घडला होता. याबाबत मुकेश खुराना यांनी फिर्याद दिली आहे. हादेखील गुन्हा
अद्याप उघडकीस आलेला नाही.

पुण्यात मुंढवा परिसरात राहणार्‍या महसूल विभागातील एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्‍याच्या घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रुपये असा एकूण 43 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता; परंतु अद्यापही पोलिस आरोपींच्या मुसक्या आवळू शकलेले नाहीत. याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून, सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये होती. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीत हा प्रकार घडला होता.

 

Back to top button