कोथरूड : स्वच्छतागृहावर अवैध मोबाईल टॉवर; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

कोथरूड : स्वच्छतागृहावर अवैध मोबाईल टॉवर; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

कोथरूड; पुढारी वृत्तसेवा: परिसरातील डहाणूकर कॉलनी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहावर अवैध मोबाईल टॉवर उभा करण्यात आला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून देखील अद्याप दखल घेण्यात आली नाही. डहाणूकर कॉलनी येथील लक्ष्मीनगरमधील गल्ली नंबर 9 येथे सार्वजनिक स्वच्छतागृहावर प्रशासनाची परवानगी न घेता खासगी कंपनीने मोबाईल टॉवर उभा केला आहे. हा टॉवर कोणत्या कंपनीचा आहे आणि तो कोणी उभा केला, याबाबत कुणालाच माहिती नाही. महापालिकेच्या मालमत्तेवर अनेक महिन्यांपासून हा टॉवर उभा आहे. यात बड्या व्यक्तीचा हात असावा, अशी शंका परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

सचिन फोलान म्हणाले, ‘महापालिकेच्या मालमत्तेवर परवानगी न घेता टॉवर उभारला आहे. त्यावर प्रशासनाकडून कारवाई झाली नाही, ही खेदजनक बाब आहे. हा टॉवर काढून तो उभारणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.’ कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी केदार वझे म्हणाले, ‘या टॉवरसाठी परवानगी देण्यात आली नाही. याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे.’ टॉवरस्थळाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button