पुणे : साहेब… निवासस्थानी बदली मिळेल का हो? एसटी कर्मचार्‍यांच्या बदली अर्जाने अधिकारी वैतागले | पुढारी

पुणे : साहेब... निवासस्थानी बदली मिळेल का हो? एसटी कर्मचार्‍यांच्या बदली अर्जाने अधिकारी वैतागले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘साहेब… निवासस्थानी बदली द्या!’ या मागणीसाठी येणार्‍या एसटी कर्मचार्‍यांनी विभागीय कार्यालयात इतका तगादा लावला, की वैतागून एसटीच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या केबिनबाहेरच फलक लावला आहे. या फलकात कोणालाही निवासस्थानी बदली मिळणार नाही, त्यामुळे सातत्याने येऊन त्रास देऊन नये, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रकांकडे निवासस्थानी बदली द्या, या मागणीसाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून सारखाच तगादा लावला.

सर्वजण काही ना काही अडचण सांगून बदली मागत होते. मग अधिकार्‍यांनी त्याची शहानिशा केली. या वेळी काही जण घराजवळ काम करता यावे, यासाठी सातत्याने बदलीसाठी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वैतागलेले विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी आपल्या केबिनच्या बाहेर ‘कोणत्याही कर्मचार्‍याने बदलीसाठी येऊ नये,’ अशा आशयाचा फलकच लावला.

जून महिन्यात वर्षातून एकदाच एखाद्याची खूपच अडचण होत असेल किंवा खूपच गरज असेल, तर त्याचे अधिकार मला आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून माझ्या कार्यालयात बदली मागणार्‍या कर्मचार्‍यांची प्रचंड गर्दी व्हायला लागली. त्यामुळे या आशयाचा फलक लावण्यात आला आहे.

                              – रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, विभाग, एसटी

Back to top button