पुणे : बंधार्‍याचे संरक्षण कठडे तुटल्याने धोका | पुढारी

पुणे : बंधार्‍याचे संरक्षण कठडे तुटल्याने धोका

लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा : देवगाव (ता. आंबेगाव ) येथे पिंपरखेड (ता. शिरूर) ते देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी बंधारा आहे. मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या बंधार्‍याचे कठडे तुटले असून, परिसरातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

बंधार्‍यावरून नेहमी लोकांची मोठी वर्दळ असते. देवगाववरून पिंपरखेडला शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही मोठ्या संख्येने आहेत. मात्र, अनेक दिवसांपूर्वी या बंधार्‍याला दोन्ही बाजूने असणारे लोखंडी साईड गार्ड तुटले आहेत. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. छोट्या विद्यार्थ्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या जिवाला धोका पाहता प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासन एखाद्या अपघाताची वाट तर पाहात नाही ना, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर लोखंडी साईड गार्ड बसवावे, अशी मागणी देवगाव ग्रामस्थ व संजीवनी ग्रुप यांनी केली आहे.

Back to top button