इंदापूर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर | पुढारी

इंदापूर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असणारे इंदापूर पंचायत समितीचे आरक्षण गुरुवारी (दि. 28) जाहीर झाले आहे. इंदापूर पंचायत समितीच्या 18 जागांसाठी आज शहरातील शंकरराव पाटील सभागृह पंचायत समितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक इच्छुकांना नव्या मतदारसंघाचा आधार घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे, तर अनेकांना मतदारसंघात हवे तसे आरक्षण मिळाले असल्याने समाधानाचे वातावरण आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समितीच्या गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली.

त्यानुसार, इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 2 गट, तर पंचायत समितीच्या 4 गणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात 9 जिल्हा परिषद सदस्य व 18 पंचायत समिती सदस्य असणार आहेत. नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथील म्हत्रे प्रतीक विठ्ठल यांच्या हातून सोडत काढण्यात आली. या वेळी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आदी उपस्थित होते.

इंदापूर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत खालीलप्रमाणे : भिगवण -सर्वसाधारण (महिला), शेटफळगढे -सर्वसाधारण (महिला), अंथूर्णे – सर्वसाधारण, बोरी- सर्वसाधारण (महिला), पळसदेव – सर्वसाधारण, बिजवडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), निमगाव केतकी – सर्वसाधारण, शेळगाव – सर्वसाधारण, वडापुरी – सर्वसाधारण (महिला), माळवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सणसर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), बेलवाडी – सर्वसाधारण, लासुर्णे – सर्वसाधारण, वालचंदनगर-अनुसूचित जाती (महिला), काटी-नागरिकांचा मागासप्रवर्ग (सर्वसाधारण), वरकुटे खुर्द – सर्वसाधारण (महिला), बावडा -अनुसूचित जाती
जमाती (महिला) आणि लुमेवाडी -अनुसूचि त जाती (पुरुष).

निवडणुका होणार चुरशीच्या
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती इंदापूर तालुक्याचे राजकारण कायम फिरत असते. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने अगदी छोट्या निवडणुकाही ताकदीने लढवल्या जातात, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही चुरशीने होणार, हे निश्चित आहे.

मातब्बरांना आरक्षणात धक्का
पुणे जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण जाहीर झाले असून इंदापूर तालुक्यातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रवीण माने, अभिजित तांबिले या मातब्बर व विद्यमान सदस्यांना धक्का बसला आहे. त्यांचे गट राखीव झाल्याने त्यांना नवीन गट व गणांचा शोध घ्यावा लागणार आहे.

Back to top button