इंदापूर तालुक्यात पावसाची प्रदीर्घ दडी! | पुढारी

इंदापूर तालुक्यात पावसाची प्रदीर्घ दडी!

बावडा; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यात पावसाने प्रदीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण दिसून येत आहे. जमिनीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी व खरीप पिकांच्या वाढीसाठी इंदापूर तालुक्यातील शेतकरीवर्ग सध्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांनी बाजरी, तूर, मका, सोयाबीन, उडीद या पिकांची पेरणी केली आहे. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत असून, या पिकांच्या वाढीसाठी सध्या पाण्याची गरज आहे. तसेच अद्यापही पुरेशा पावसाअभावी जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही.

परिणामी, अनेक ठिकाणी विंधनविहिरी बंद आहेत. तसेच तळी, पाझर तलाव, ओढे, नाले कोरडे आहेत. तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे खरीप पिकांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. तरीही उपलब्ध क्षेत्रावर शेतकरी खरीप पिके घेत आहेत. पेरणी केलेली खरीप पिके उगवून आली असून, या पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. इंदापूर तालुक्यात चालू पावसाळ्यात जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे दमदार पावसाची आवश्यकता असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. बुधवारी ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिली.

Back to top button