वडगाव शेरी-हडपसर बस पूर्ववत करण्याची मागणी | पुढारी

वडगाव शेरी-हडपसर बस पूर्ववत करण्याची मागणी

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  वडगाव शेरी ते हडपसर पीएमपी बससेवा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन मनसे महिला सेनेच्या विभाग अध्यक्ष दीपाली महेश शिर्के यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) दिले. वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी शाखाध्यक्ष लता पवार, उपविभाग अध्यक्ष महेश शिर्के, शाखाध्यक्ष शुभम आल्हाट आदी उपस्थित होते. वाहतूक व्यवस्थापक झेंडे यांनी महामंडळाच्या बैठकीत सदर विषय मांडून बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत विचार करू, असे आश्वासन दिले. पीएमपीने काही वर्षांपूर्वी वडगाव शेरी ते हडपसर बससेवा सुरू केली होती.

या बससेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद होता. परंतु, काही महिन्यांपासून ही बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशी, विद्यार्थी आणि आयटी कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. बससेवा पूर्ववत सुरू न केल्यास वडगावशेरी मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने आंदोलन करण्याचा इशारा या वेळी पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

Back to top button