पुणे : भीमाशंकरला प्लास्टिकबंदी नावापुरतीच! | पुढारी

पुणे : भीमाशंकरला प्लास्टिकबंदी नावापुरतीच!

भीमाशंकर, अशोक शेंगाळे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्लास्टिकबंदी असली, तरी पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व प्लास्टिक पिशव्या बाहेरून आणल्या जातात. याचा मोठ्या प्रमाणात मंदिरापासून बसस्थानकापर्यंत तसेच पुढे एमटीडीसी ते वाहनतळ 1 ते 3 किलोमीटरपर्यंत खच पाहावयास मिळत आहे. पवित्र शिवलिंगावर चढवलेले हार, फुले यांचे ढीगही घाणीत टाकलेले आढळत आहेत. यातच अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.

प्लास्टिक हे अविघटनशिल घटक असल्याने तो कुजत नाही. हे प्लास्टिक वन्य-जीवांच्या आहारात आल्यास वन्यजीवांना धोका निर्माण होत आहे. तसेच बसस्थानकापासून मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत दोन्ही बाजूने दुकाने व हॉटेल आहे. यामुळे येथील सांडपाणी इतरत्र पसरत असल्याने तसेच ओला कचर्‍यामध्ये प्लास्टिक, फुलांचे हार, कुजलेले खाद्यपदार्थ याची दुर्गंधी वाढल्याने याठिकाणी असणारी मोकाट जनावरे, कुत्री याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा काही अंशी परिणाम भाविक तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. भीमाशंंकर परिसरातील केरकचरा उचलण्यासाठी असणारी गाडी बंंद आहे. यामुळे वन्यजीव विभाग व देवस्थान समिती कुचकामी
ठरले आहे.

यातच भीमाशंंकर येथे नव्याने बांधण्यात आलेले बसस्थानक सुसज्ज असून, त्या ठिकाणी बसस्थानक व त्याच्या आवारात एसटी गाड्यांऐवजी खासगी वाहने, मोकाट जनावरे, कुत्री, प्लास्टिक केरकचरा, शेणाचे ढीग, जनावरांची विष्ठा अशी घाण पसरली आहे. याकडे एसटी महामंडळ जाणूनबुजून कानाडोळा करीत आहे. या दुर्गंधीमुळे बसस्थानक परिसरात ये-जा करणार्‍या भाविकांना गाडीतून उतरताना प्रथम दर्शन दुर्गंधीचे होते. मुळातच भीमाशंंकर परिसरात स्वच्छता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाची आहे. मात्र, त्यांच्या कुचकामी कारभारामुळे स्थानिक नागरिकांसह भाविकांना घाणीतूनच प्रवास करावा लागतो. यामुळे भीमाशंंकर परिसराचा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देवस्थानच्या कृपाशीर्वादाने खासगी पार्किंग फोफावली

लाखो रुपये खर्च करून येथे बसस्थानक बांधण्यात आले असले, तरी तेथे देवस्थानच्या कृपाशीर्वादाने खासगी पार्किंग फोफावली आहे. यामुळे बसस्थानक ते एम.टी.डी.सी. रस्त्याकडेच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागल्याने वाहतूक कोंडी होते. परंतु, एसटी महामंडळाच्या बेजबाबदार नियोजनामुळे बसस्थानक आवारात नागरीक, भाविकांना आवश्यक असणार्‍या सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. उलट संपूर्ण स्थानकात केरकचरा, शेणाचे ढीग, मोकाट जनावरे, कुत्री, खासगी वाहने यांना दुर्गंधीतून प्रवास करावा लागत आहे.
भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी प्लास्टिक बाटल्या, कचर्‍याचे ढीग पाहावयास मिळत आहे.

Back to top button