कृषी विभागाचा खरिपासाठी 28 कलमी कार्यक्रम; शेतकर्‍यांच्या तांत्रिक मार्गदर्शनावर भर

कृषी विभागाचा खरिपासाठी 28 कलमी कार्यक्रम; शेतकर्‍यांच्या तांत्रिक मार्गदर्शनावर भर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यकांवर अधिक जबाबदारी देण्यात आली असून गावनिहाय नियोजनाचा कृति आराखडा निश्चित करून देण्यात आला आहे. योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीबरोबरच शेतकर्‍यांना बांधावर जाऊन बीज प्रक्रियेसह अनुषंगिक बाबींमध्ये तांत्रिक मार्गदर्शन करण्याचा 28 कलमी कार्यक्रम पुणे विभागात हाती घेण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी दिली.

गावनिहाय खरिपासाठी कृती आराखडा

पुणे विभागात पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होतो. त्यानुसार प्रत्येक गावात बीज प्रक्रिया मोहीम प्रात्यक्षिकांसह हाती घेण्यात आली आहे. बि-बियाणे, खतांसह निविष्ठांची निवड, प्रात्यक्षिकांचा गांवनिहाय आराखडा तालुका कृषी अधिकारी तयार केलेला आहे. घरगुती चाचणी पध्दतीने बियाणे उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, ऊस पाचट व्यवस्थापन, हुमणी किड नियंत्रण प्रात्यक्षिक मोहिम, क्रॉपसॅप व हॉर्टसॅपसाठी पीक लागवडीपासून शेतकरी निवड, शेतावर जाऊन शेतीशाळा घेणे, पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गावनिहाय प्रशिक्षण मोहीम, महाडीबीटी प्रणालीवर शेतकरी अर्जांची संख्या वाढविणे, निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी नियंत्रण कक्ष हा तालुका व जिल्हा स्तरावर स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भरारी पथकेही तपासणीसाठी कार्यरत करण्यात येत आहेत.

भौगोलिक मानांकन पिके, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतंर्गत शेततळे अर्ज संख्या वाढविणे, तालुकास्तरावर खरीप हंगाम नियोजन, बी-बियाणे, खते,औषधांचे परवाने देणे, तालुका बीज गुणन केंद्र व फळरोपवाटिाची, फळबाग लागवडीत तंत्रज्ञानाचा वापर वाढ करणे, पिक स्पर्धा आयोजित करणे, मूलस्थानी जलसंधारण तथा बीबीएफ तंत्रज्ञान वापर, भात पट्ट्यात यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर, चारसुत्री लागवडीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जमिनी सुपिकता निर्देशाकांआधारे खते वापर, पुरस्कारासाठी शेतकरी निवड, शेतकरी गट व शेतकरी उत्पाद कंपन्यांची स्थापना करणे, माती नमुने काढणे आणि फळबागा जतन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

निविष्ठा विक्रींवर राहणार करडी नजर

कृषी निविष्ठांचा सुरळीत, योग्य किमतीत व दर्जेदार पुरवठा होण्यासाठी निविष्ठा विक्रीचा कालावधी विचारात घेऊन 30 दिवसांच्या कालावधीसाठी कृषी सेवा केंद्रनिहाय अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन पीक नियोजन, निर्यातीसाठी हॉर्टनेट, ट्रेसेबिलिटी नेटद्वारे शेतकर्‍यांच्या नोंदणीस प्राधान्य, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतील शेतकर्‍यांचा सहभाग वाढविणे आणि मनरेगातून फळबाग लागवड वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news