कचर्‍याच्या ढीगामुळे वाकडकर त्रस्त | पुढारी

कचर्‍याच्या ढीगामुळे वाकडकर त्रस्त

वाकड : महापालिकेच्या स्वच्छता अभियानांतर्गत परिसरातील सर्व कचराकुंड्या उचलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकत असल्यामुळे परिसरात कचर्‍याचे ढीग साचल्याचे दिसत आहे. वाकड परिसरातील सोसायटीच्या बाजूला कचर्‍याचे ढीग आढळून येत आहेत. नागरिकांकडून स्वच्छता राखली जात नसल्यामुळे परिसर साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे हा साठलेला कचरा साथीच्या रोगांना आमंत्रण देत आहे, महापालिकेकडून वेळोवेळी नागरिकांना ओला व सुका कचरा कसा गोळा करायचा याचे प्रशिक्षण देत असून, सुद्धा नागरिक या गोष्टीकडे डोळे झाक करीत आहेत.
सोसायटीमधील नागरिक कचरा रस्त्याच्याकडेला मोकळ्या जागेत किंवा उद्यानाशेजारी टाकून देतात. पावसामुळे या कचर्‍यातून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सकाळी कचरा उचलून नेल्यानंतर पुन्हा रात्री लोक त्याच ठिकाणी कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे.

जागोजागी टाकलेल्या कचर्‍यामुळे परिसरातील मोकळी जनावरे कचरा रस्त्यावर आणतात आणि त्या कचरा शेजारून नागरिक जात असतील ते त्यांच्या अंगावरती धावून येतात. त्यामुळे नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करावे आणि रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. अंधार असलेल्या ठिकाणी हॉटेलमधील कचरा किंवा उपहारगृहच्या गाड्यांवर जमा होणारा कचरा, नागरिकांच्या घरातील कचरा हा रात्रीच्या वेळी अंधार असलेल्या ठिकाणी रस्त्यावरती फेकला जातो. यावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्यासमुळे कचर्‍याचे ढीग जमा होत आहेत. परिसरात ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे आणि रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

महापालिकेकडून एक किलोमीटर अंतरावर कचराकुंडी ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच, निर्माल्य ठेवण्यासाठी कुंड्या ठेवण्यात आले होत्या. परंतु, सध्या त्याही गायब झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर कचर्‍याची समस्या सोडवावी.
– दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी

Back to top button