प्लास्टिक, थर्माकोलपासून ऑईल पेंट, डिझेल, वीटनिर्मिती; जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीने उभारला प्रकल्प | पुढारी

प्लास्टिक, थर्माकोलपासून ऑईल पेंट, डिझेल, वीटनिर्मिती; जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीने उभारला प्रकल्प

दिनेश गुप्ता

पुणे : कचर्‍यातील प्लास्टिक, थर्माकोलवर प्रक्रिया करून बॉयलरसाठी लागणारा कोळसा, जनरेटरचे डिझेल व छताच्या वॉटरप्रूफिंगसाठी लागणारा ऑईल पेंट निर्माण केला जातो. हे कधी ऐकलेले नाही. मात्र, हे अनोखे संशोधन पुण्यातील सायन्स व टेक्नॉलॉजी पार्कच्या संशोधकांनी करून दाखविले आहे. यामुळे शहरातील मोठ्या सोसायट्यांनाही कचर्‍यातून मोठ्या कमाईबरोबरच अल्प दरात डिझेल मिळविणे सोपे झाले आहे. संशोधनाच्या सुरुवातीलाच पुण्यातील हे संशोधन कुवैत देशाने विकत घेत त्यांच्या देशात हा प्रयोग सुरू केला आहे. जुन्नर तालुक्यातील पिरगुंट ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष उत्पादने

निर्मितीचा प्रकल्प उभारला असून, उत्पादन सुरू करण्यात आले आहे. देशभरातील संशोधक उद्योजकांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एडीएसटी) वतीने प्रयास प्रयोगांतर्गत नवनवीन संशोधनासाठी प्रकल्पास मंजुरी देत निधी पुरवला जातो. संशोधक उद्योजकांच्या सोयीचे हे काम पुण्यातील सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क करते. 2014 पासून पुण्यातील एका संशोधक उद्योजकाने कचर्‍यातील प्लास्टिक व थर्माकोलवर प्रक्रिया करून ऑईल पेंट व डिझेल तयार करण्यात यश मिळवले. हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसताच त्यांनी प्रकल्पातून निघणार्‍या वेस्टपासून जळणाचे इंधन, एलपीजीसारखा ज्वलनशील गॅस व निघणार्‍या कार्बनच्या राखेपासून वीटनिर्मितीवर संशोधन सुरू केले. या संशोधनात सायन्स व टेक्नॉलॉजी पार्कच्या संचालकांनी मोठे योगदान दिले.

भारतीय मानकात उतरले डिझेल, ऑईल
संशोधनातून तयार झालेले डिझेल भारतीय मानकानुसार आहे की नाही, हे तपासण्यात आले. या चाचणीत हे डिझेल 6 मानक उतरले आहे. वाहनात वापरल्या जाणार्‍या डिझेलमध्ये 20 ते 25 टक्के हे डिझेल टाकले, तर वाहनातून बाहेर पडणार्‍या धुरात प्रदूषणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळून आले. ऑईलमधून तयार झालेल्या ऑईल पेंटमुळे वॉटरप्रूफिंगची गुणवत्ता शंभर टक्के आढळून आली. त्याचबरोबर या ऑईल पेंटमुळे भिंतीवर लस्टर कलरसारखी फिनिशिंग येत असल्याचे स्पष्ट झाले.

स्मोकलेस चूल व राखेपासून वीट
प्लास्टिक व थर्माकोलवर प्रक्रिया केल्यानंतर एलपीजीसारखा उपयुक्त गॅस वेफर्स व चकल्या बनवणार्‍या छोट्या उद्योजकांना अत्यल्प दरात मिळत आहे. बॉयलरसाठी लागणारा गॅस प्रदूषणविरहित स्मोकलेस चूल अशी ओळख निर्माण झाली आहे. कोळशाला पर्याय म्हणून ग्रीन कोळसा म्हणून ओला कचरा सुखा करण्यासाठी प्लास्टिकचा कोळसा वापरला गेला. या कोळशाच्या राखेपासून वीट तयार करण्यात यश आले असून, अनेक बांधकाम व्यावसायिक याचा वापर करीत आहेत.

पेटंटही मिळवले
सायन्स व टेक्नॉलॉजी पार्कच्या संशोधनावर पेटंटही मिळवण्यात आले आहे. दिल्ली, केरळ, अरुणाचल प्रदेश, आसाम व मुंबईतील पालघरसारख्या राज्यात या प्रयोगावर काम सुरू आहे. पुण्यातील हिंजवडी टाऊनशिपमध्ये या संशोधनानंतर मोठे काम सुरू आहे. तर जुन्नर तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायतीकडे या संशोधनाचा एक प्रकल्प स्वाधीन करण्यात आला आहे.

दोन टन प्लास्टिकपासून मिळतो 15 टक्के ऑईल पेंट, 45 टक्के डिझेल, 40 टक्के इंधन
दररोज 2 टन प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यातून 15 टक्के ऑईल पेंट, 45 टक्के डिझेल व 40 टक्के ज्वलनशील तेल मागील दोन वर्षांपासून तयार केले जात आहे. पुण्याचा हा यशस्वी प्रयोग कुवैत देशाने त्यांच्या देशात राबवण्यास सुरुवात केली असून, बहरीन व मोरक्को देशाने खराब झालेल्या टायरवर ही प्रक्रिया केली जाऊ शकते का, यावर संशोधन करण्याची विनंती केली आहे.

वेस्टेजपासून बेस्ट डिझेल; वाहने प्रदूषणमुक्त
विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कमधील शास्त्रज्ञांनी कुवैत सरकारला पहिले संशोधन विकल्यानंतर पुन्हा केलेल्या सुधारित संशोधनातून आणखी चार उपयुक्त पदार्थ तयार केले. त्यात जनरेटरला वापरले जाणारे डिझेल, जळणासाठी तेल, ऑईल पेंट आणि कार्बनयुक्त राखेतून विटांची निर्मिती हे ते पदार्थ आहेत. टाकाऊ थर्माकोल आणि प्लास्टिकपासून बनविलेले डिझेल शास्त्रज्ञांनी स्वतःच्या वाहनात वापरले. त्याची चाचणी घेतली असता कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे निष्पन्न झाले.

Back to top button