वाहतूक कोंडीने पर्यटकांची गैरसोय; सिंहगड पायथा परिसरातील चित्र | पुढारी

वाहतूक कोंडीने पर्यटकांची गैरसोय; सिंहगड पायथा परिसरातील चित्र

किरकटवाडी; पुढारी वृत्तसेवा: सिंहगडच्या पायथ्याला असलेला गोळेवाडी येथील चौक सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या चौकातून सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सिंहगडच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी आतकरवाडी मार्गे पायवाटेने जाण्यासाठी एक रस्ता आहे, तर दुसरा रस्ता वाहने घेऊन जाण्यासाठी आहे.

या चौकात व्यावसायिकांनी अतिक्रमणे करत दुकाने थाटल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. एका बाजूला डोणजे, तर दुसर्‍या बाजूला घेरा सिहंगड अशा दोन ग्रामपंचायतींच्या हद्दीत हा चौक येतो. शनिवार-रविवार या सुटीच्या दिवशी पंधरा ते वीस हजार पर्यटक दिवसभरात सिंहगडाला भेट देतात. त्यामुळे या चौकात वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्यांची गैरसोय होत आहे.

ग्रामपंचायतीच्या सूचनेकडे दुर्लक्ष
स्थानिक व्यावसायिकांनी या चौकामध्ये अगदी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. याचा फटका पर्यटकांना बसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणे हटवण्यासाठी अनेकदा सांगितले आहे. मात्र, व्यावसायिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्यावर दुकाने थाटणार्‍या व्यावसायिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यटक व नागरिकांकडून होत आहे.

सिंहगडावर पर्यटक आणि शिवप्रेमींची नेहमीच गर्दी असते. या चौकात व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. याविषयी प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे . मात्र, ही समस्या अद्याप सुटली नाही.

                                            -नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य

Back to top button