पुणे : गवार, भेंडी, फ्लॉवर, कोबी, वांगी महागली; जाणून घ्या बाजारभाव एका क्लिकवर | पुढारी

पुणे : गवार, भेंडी, फ्लॉवर, कोबी, वांगी महागली; जाणून घ्या बाजारभाव एका क्लिकवर

पुणे : पावसाच्या संततधारेचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामध्ये भेंडी, गवार, वांगी, कोबी, फ्लॉवर या फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात या फळभाज्यांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडल्याने भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी 100 वाहनांमधून शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक दहा वाहनांनी घटल्याचे सांगण्यात आले.

बाजारात टोमॅटोच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. तसेच, परराज्यासह पुणे विभागातूनही घेवड्याचीही आवक वाढल्याने दोन्हीच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. हिमाचल प्रदेश येथील मटारचा हंगाम संपला असून बाजारात बेळगाव व धारवाड येथून मटार दाखल होत आहे. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 3 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, 3 टेम्पो पावटा, इंदौर येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, बेळगाव, धारवाड येथून 200 गोणी मटार तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 13 ते 14 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 पोती, टोमॅटो 12 हजार ते 13 हजार क्रेटस, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 100 ते 125 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, मटार 50 गोणी, कांदा 50 ते 55 ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि आग्रा व स्थानिक भागांतून बटाटा 50 ते 55 ट्रक इतकी आवक झाली.

पालेभाज्यांचा दर्जा सुधारला; दरात वाढ

पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात दर्जेदार पालेभाज्यांच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात शेपूच्या भावात चार रुपये, कोथिंबीर तीन रुपये, मेथी, चाकवत, पुदीना आणि पालकच्या भावात प्रत्येकी दोन रुपये, तर कांदापात, राजगिरा आणि चवळईच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोंथिंबीरीची आवक 25 हजार जुड्यांनी घटली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 4 ते 15 रुपये तर किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये इतके राहिले.

 

 

Back to top button