आळंदी : आषाढी पायी वारीची सांगता; वारकर्‍यांनी धरली घरची वाट | पुढारी

आळंदी : आषाढी पायी वारीची सांगता; वारकर्‍यांनी धरली घरची वाट

आळंदी; पुढारी वृत्तसेवा: सुमारे महिनाभराचा पायी प्रवास, आळंदी ते पंढरपूर व पंढरपूर ते आळंदी करत आळंदीत दाखल झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याची रविवारी एकादशीला पालखी नगरप्रदक्षिणेने सांगता झाली. कोरोनाच्या भीषण संकटामुळे दोन वर्षांनंतर यंदाच्या सोहळ्यात लाखो वैष्णवांचा मेळा संपूर्ण महिनाभर वारीत रममाण झाल्याने यंदाची वारी विशेष ठरली. आळंदीत नगरप्रदक्षिणा पार पडल्यानंतर वारकर्‍यांनी आता परतीची वाट धरली आहे. पायीवारी पालखी सोहळ्याची रविवार ( दि.24) रोजी एकादशीला पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.

पहाटे दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले होते. भागवत एकादशी निमित्त राज्यभरातून दाखल झालेले भाविक, पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरवरून आळंदीत दाखल झालेले वारकरी यामुळे आळंदी गजबजून गेली होती. दुपारी एकच्या सुमारास माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडली. महाद्वार, इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्तामार्गे पालखी वडगाव चौक येथून हजेरी मारुती मंदिरात विसावली.

यावेळी नाईकांच्या वतीने मानाच्या दिंड्या विणेकरी, मानकर्‍यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या हजेरीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मंदिरात दाखल झाली. मंदिर प्रदक्षिणा मारल्यानंतर देऊळवाड्यात संस्थानच्या वतीने मानकर्‍यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. दरम्यान, पायीवारी पालखी सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर वारकर्‍यांनी सायंकाळी परतीची वाट धरली. यामुळे बसस्थानक, एसटी थांबा, खासगी प्रवाशी वाहतूक आदी ठिकाणी वारकर्‍यांनी गर्दी केली होती.

Back to top button