पुणे : 39 तोळे सोने चोरीचा बनाव उघड; कर्जबाजारी झाल्याने जबरी चोरीची तक्रार | पुढारी

पुणे : 39 तोळे सोने चोरीचा बनाव उघड; कर्जबाजारी झाल्याने जबरी चोरीची तक्रार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चोरट्याने व्यावसायिकाच्या पत्नीच्या गळ्याला चाकू लावून घरातील 39 तोळे सोन्याचे दागिने व रोकड, असा तब्बल 21 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना शनिवारी घडली. या प्रकाराने पोलिस खडबडून तपासाला लागले. मात्र, तपासात संबंधित व्यावसायिकानेच बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका 53 वर्षीय व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी लागलीच श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. इमारतीतील इतर रहिवाशांकडे तपास केला. परंतु, कोणतीही संशयित हालचाल दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी फिर्यादी व घरातील सदस्यांकडे वेगवेगळी चौकशी केली. तेव्हा त्यांनी विसंगत माहिती दिली. तेव्हा पोलिसांना संशय आला व त्यांनी फिर्यादीकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने खोटी तक्रार दिल्याचे सांगितले.

…म्हणून रचला चोरी झाल्याचा कट
व्यावसायिकावर 42 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. ती रक्कम भागविणे त्यांना जिकिरीचे झाले होते. घरामध्ये मोठी चोरी झाली आहे, असा बनाव केला तर देणेकर्‍यांची सहानुभूती प्राप्त होऊन कर्जाचे पैसे देण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी हा बनाव केल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button