‘हर घर तिरंगा’ अभियान तळेगावात राबविणार | पुढारी

‘हर घर तिरंगा’ अभियान तळेगावात राबविणार

तळेगाव दाभाडे : शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्येच माफक दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहयोगानेच प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीकरीता ध्वज फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले.

देशाच्या स्वातंत्र्यला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनामार्फत देशभरात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची पूर्व तयारी म्हणून नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची नियोजन बैठक घेण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, संगणक अभियंता अभिजित गोंधळी, महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा काळे यांच्यासह अधिकारी शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशाचा दैदिप्यमान इतिहास नागरिकांच्या मनात तेवत राहावा या उद्देशाने केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या वतीने देखील हे अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Back to top button