पुणे : मतदार यादीचा घोळ संपेना; मुदत संपली तरी याद्या प्रसिद्ध नाहीत | पुढारी

पुणे : मतदार यादीचा घोळ संपेना; मुदत संपली तरी याद्या प्रसिद्ध नाहीत

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमधील घोळ संपण्याचे नाव घेत नाही. प्रशासनाने जाहीर केल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना आल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यास दिलेली मुदतवाढ गुरुवारी (21 जुलै) संपूनही शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने गुरुवारी रात्री उशिरा अर्धवटच आकडेवारी प्रसिद्ध करून गोंधळात आणखीन भर घातली. महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयार केलेल्या मतदार यादीची फोड करून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे.

मात्र, या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. बहुतांश प्रभागातील हजारो मतदार दुसर्‍या प्रभागात गेल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. परिणामी, प्रारूप मतदार याद्यांवर 4 हजार 273 हरकती व सूचना आल्या. निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा जाग्यावर जाऊन निपटारा करून 16 जुलै रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या. मात्र, हरकती व सूचनांची संख्या जास्त असल्याने महापालिकेने आयोगाकडे 23 जुलैपर्यंत मुदतवाढ मगितली होती. त्यानंतर आयोगाने 21 जुलैपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार गुरुवारी (21 जुलै) रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणे अपेक्षित होते. मतदार याद्यांमधील घोळ, मतदारांची संख्या, एकूण मतदार यांचा ताळमेळ लागला नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर होऊ शकल्या नाहीत.

मतदारांची संख्या 34 लाख 54 हजार 639

मतदार याद्यांचा घोळ संपत नसतानाच महापालिका प्रशासनाने सहा प्रभागातील अंतिम मतदार संख्या न देता अर्धवट आकडेवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली. या आकडेवारीनुसार शहराच्या हद्दीबाहेरील व कॅन्टोन्मेंटमधील 4 हजार 75 मतदार वगळ्यात आल्याने महापालिकेसाठी अंतिम मतदारांची संख्या 34 लाख 54 हजार 639 इतकी निश्चित झाली.

 

Back to top button