पुणे : ‘इन्स्टाग्रामवर ‘लालपरी’ फॉर्मात; एसटी गाड्यांचे सर्वाधिक रील्स, व्हिडीओ व्हायरल | पुढारी

पुणे : ‘इन्स्टाग्रामवर ‘लालपरी’ फॉर्मात; एसटी गाड्यांचे सर्वाधिक रील्स, व्हिडीओ व्हायरल

प्रसाद जगताप

पुणे : ‘ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती… ’, ‘हा धुंद गार वारा…’, ‘काय सांगू देवा तुला कर्म कहाणी, चांगभलं गाताना डोळ्यांत पाणी…’ यांसारखी मराठी-हिंदी गाणी आणि केजीएफ-रॉकी अभी जिंदा है…, हमारा सिर्फ एकही बिझनेस होवे, ट्रान्सपोर्ट का… यांसारखे चित्रपटातील डायलॉग लावून एसटी महामंडळाची लालपरी सध्या इन्स्टाग्रामवर फॉर्मात असल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्यार्‍या देशातील इतर वाहनांपेक्षा सर्वाधिक व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे दिसत आहेत.

हे व्हिडीओ फक्त पुण्यातीलच नसून, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, मुंबई, पंढरपूर, नाशिक, रत्नागिरी, चिपळूण, दिवे आगार, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर धुमा़कूळ घालत आहेत. एमएसआरटीसी सह्याद्री, एमएसआरटीसी कोकणची राणी, एमएसआरटीसी फॅन, एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुप, एमएसआरटीसी क्लिक, ओन्ली एमएसआरटीसी, एमएसआरटीसी क्वीन यांसारख्या अनेक इन्स्टाग्रामच्या पेजवर एसटी गाड्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान शेअर होत असल्याचे दिसत आहे.

…तेव्हापासून व्हिडीओ शेअरिंगला सुरुवात
कोरोनाकाळात पालखी सोहळ्यावर निर्बंध आल्यामुळे पायी वारी झाली नाही. मात्र, याच काळात शासनाने देहू-आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका एसटी बसने नेण्यास परवानगी दिली. त्यावेळी एसटीच्या दोन बस झेंडूच्या फुलांनी आकर्षकरीत्या सजवून कडेकोट बंदोबस्तात पादुका घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी या गाड्या ज्या-ज्या मार्गाने गेल्या, त्या त्या ठिकाणच्या तरुणाईने एसटीच्या बसचे अनेक व्हिडीओ माउलींची गाणी, अभंग लावून इन्स्टाग्रामवर रील्स व्हिडीओ शेअर केले. त्यानंतर एसटी बसचे व्हिडीओ शेअर होण्यास सुरुवात झाली असून, जुन्या लालपरीपासून ते आत्ताच्या इलेक्ट्रिक एसटीपर्यंतचे रील्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत, असे एका नेटकर्‍याने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

या प्रकारे काढले जातात व्हिडीओ
महामार्गावरून सुसाट धावणारी एसटी बस वॉशिंग करताना उभी असलेली एसटी बस घाट रस्त्याने धावणारी एसटी बस जोरदार पावसात उभी असलेली एसटी एसटी चालविणारा चालक एसटीसमोर नाचणारा व्यक्ती आगारातून सुटणारी एसटी.

इन्स्टाग्रामवरील पीएमपीची योजना
पीएमपीच्या बसचेसुद्धा इन्स्टाग्रामवर फोटो जास्तीत-जास्त शेअर व्हावेत, याकरिता पीएमपीने एक विशेष योजना सुरू केली आहे. नागरिकांनी स्वत: टिपलेला फोटो पीएमपीच्या व्हॉट्सअ‍ॅप, ईमेलवर पाठविला तर पीएमपी प्रशासन त्या व्यक्तीच्या नावाने पीएमपीच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर शेअर करत आहे, अशी पीएमपीची योजना आहे. मात्र, कोणतीही योजना नसताना एसटीचेच सर्वाधिक व्हिडीओ फोटो इन्स्टाग्रामवर शेअर झाले आहेत.

 

Back to top button