पुणे : सराफी दुकानातून 5 किलो सोन्याची बिस्किटे लंपास | पुढारी

पुणे : सराफी दुकानातून 5 किलो सोन्याची बिस्किटे लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सराफी दुकानात सोने खरेदीसाठी जाऊन गाडीत ठेवलेले पैसे आणून देण्याच्या बहाण्याने पाच किलो सोन्याची बिस्किटे घेऊन एका सराईत महिलेने पोबारा केला. यात 2 कोटी साठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बारा तासांच्या आत त्या महिलेला खारघर येथून बेड्या ठोकत ऐवज जप्त केला. माधवी सूरज चव्हाण (32, रा. खारघर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोपटलाल गोल्डचे राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित आरोपी महिला ही मूळची खारघरची असून, ती तिचे पती सूरज चव्हाण यांच्याबरोबर राहण्यास आहे, तर तिचे माहेर पुण्यातच असून तिची बहीणदेखील पुण्यातच राहण्यास आहे. पुण्यातून सोने घेऊन ते पुढे जास्त किंमतीला देण्याचे काम ती करत होती. ती सध्या गर्भवती आहे. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माधवी रविवार पेठेतील पोपटलाल गोल्डच्या दुकानात आली. नेहमी किलो, अर्धा किलो अशा वजनाचे सोने ती खरेदी करत असे.

बुधवारी तिने प्रेगनंट असल्याचे, वारंवार येण्यास जमणार नसल्याचे कारण देत तब्बल 5 किलो सोन्याची बिस्किटे खरेदी केली. तिने काही रक्कम कॅश आणि काही रक्कम आरटीजीएस करणार असल्याचे सांगितले. सोन्याची बिस्किटे खरेदी केल्यानंतर गाडीत ठेवण्यात आलेली कॅश घेऊन येण्याच्या बहाण्याने तिने दुकानातून पोबारा केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून तिचा माग काढत तिला खारघर येथून अटक केली.

अटक करण्यात आलेली महिला ही सोन्याची बिस्किटे घेऊन बाहेर पडल्यानंतर तिने एक रिक्षा करून वाकड गाठले. तेथून शेअर कारने ती खारघर येथे गेली. तिचे घर मूळ स्थानकापासून लांब असल्याने तेथूनही तिने रिक्षाने प्रवास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

                 – संतोष शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे.

Back to top button