पुणे : आंबेगावात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण | पुढारी

पुणे : आंबेगावात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण

मंचर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात कधी ऊन, कधी पाऊस, अशा सतत वातावरणात होणार्‍या बदलामुळे घरोघरी सर्दी, खोकला आणि ताप आदी लक्षणे आढळणारे रुग्ण दिसू लागले आहेत. कोरोनाही पाय पसरू लागला आहे. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना? या धास्तीत लोक आहेत.

औषधांच्या दुकानात सर्दी, खोकल्याची औषधे घेणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आंबेगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातही ‘व्हायरल फीव्हर’चा जोर असल्याने गावागावांत सर्दी-तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारांसाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतची रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून रिमझिम पाऊस सुरू असून, वातावरणात नेहमीच बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

साधी सर्दी, खोकला किंवा तापाचे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी जात असल्याने शासकीय रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे. ताप असलेल्या व्यक्तीने घरच्यांपासून वेगळे राहावे, लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घ्यावी, आरोग्य यंत्रणेचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावेत. बदललेले वातावरण हेही कारण सद्य:स्थितीत ऊन, पाऊस, मध्येच थंडी असा सतत बदल वातावरणात होत असल्यामुळे या वातावरणाचा फटका मानवी शरीरावर पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.

Back to top button