दौंडमध्ये खुलेआम खोटी लॉटरी सुरू | पुढारी

दौंडमध्ये खुलेआम खोटी लॉटरी सुरू

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर खुलेआमपणे खोटी लॉटरी, चक्री, कॉइन बॉक्स, सोरट व इतर अवैध धंदे सुरू आहेत. सर्व धंद्यांची पोलिसांना इत्थंभूत माहिती असूनही कारवाई होत नसल्याने पोलिसांना दरमहा यातून चांगलीच कमाई होत असल्याची चर्चा होत आहे.

अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पुण्यातून आलेले गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाला काहीच सापडले नाही. अवैध धंदेवाल्यांना कारवाईपूर्वीच पोलिसांकडून माहिती दिल्याने पथकाला काही सापडले नाही, असे बोलले जात आहे. शहरात पत्त्याचे क्लबही राजकीय वरदहस्ताने सुरू आहेत. याबाबत कोणी तक्रार केली तर सर्व अवैध धंदेवाले एकत्र येऊन त्याच्याविरोधातच खोटी तक्रार देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे यांच्या विरोधात कोणीही तक्रार देण्यास तयार होत नाही.

शहरात गँगवार होण्याची शक्यता?
दौंड शहरात खासगी सावकारीही जोरात सुरू आहे. अनेक जण यामध्ये भरकटले गेले असून, ते केवळ या सावकारांच्या गुंडगिरीला घाबरून पोलिस स्थानकात तक्रार देत नाहीत. सध्या निवडणुका जवळ आल्याने अवैध धंदेवाल्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दुसर्‍यांच्या नावावर व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे. अवैध धंद्यांवरून दौंड शहरात गँगवार होण्याची शक्यता आहे. पोलिस यांच्या मुसक्या आवळणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Back to top button