पिंपरी : गोमय गणेशमूर्तीतून संस्कृती, पर्यावरण संवर्धनाचा मेळ | पुढारी

पिंपरी : गोमय गणेशमूर्तीतून संस्कृती, पर्यावरण संवर्धनाचा मेळ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या मूर्ती कारगीरांची गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. करोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. पण यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या धर्तीवर पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी काही तरुणांनी एकत्र येत गोमय गणेशाची संकल्पना समोर आणली. गाईच्या शेणापासून साकार करण्यात येणार्‍या गोमय गणेशाला सध्या वाढता प्रतिसाद मिळत आहे.

पुण्यातील जयेंद्र घोलप आणि ठाण्यातील नरेश नागपुरे या दोन कलाकारांनी कला आणि पर्यावरणाची सांगड घातली आहे. गोमयावर शास्त्रीय प्रयोग करुन त्यापासून सुबक मूर्ती घडवण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यातून पहिल्याच वर्षी हा प्रयोग यशस्वी झाल्याचे ते सांगतात. शेणावर प्रक्रीया करुन त्यामध्ये सुगंधी द्रव्ये एकत्र की जातात. यामध्ये गुलाबपाणी, चंदन, हळद मिसळले जातात. त्यातून गणपतीची मूर्ती घडवली जाते. यासाठी वापरले जाणारे रंग नैसर्गिक असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. साधारण आठ इंचापासून ते एक फूटापर्यंत या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोमय गणेशमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. ही मूर्ती घरातच विसर्जित करता येणार आहे. गोमय गणेशामुळे घरात पंचतत्व वास करतात असा भारतीय संस्कृतीमध्ये धारणा आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीबरोबर पर्यावरणाला देखील हातभार लावता येणे शक्य होणार आहे.

Back to top button