पिंपरी : पुष्पा, पपेट अन् डॅशिंग ब्रो राखी! आकर्षक राख्यांनी सजली दुकाने | पुढारी

पिंपरी : पुष्पा, पपेट अन् डॅशिंग ब्रो राखी! आकर्षक राख्यांनी सजली दुकाने

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : रक्षाबंधन सणास अजून बराच अवधी आहे. मात्र, पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठांमध्ये राखी खरेदीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. सुरेख, डिझायनर, पारंपरिक, कार्टुनच्या, राख्यांना विशेष मागणी आहे. तसेच यंदा कुंदन राख्यांकडे महिलावर्गाचा अधिक कल असल्याचे पाहायला मिळते आहे. तर बच्चे कंपनीसाठी लाईटच्या आणि म्युझिकल कार्टुनच्या राख्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत.

रंगबेरंगी आकर्षक राख्या महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात नेहमीसारखे स्टोन राखी, गोंड्याची राखी, ब—ेसलेट राखी, कार्टूनची राखी, डायमंड राखी, लायटिंगची राखी, अशा विविध प्रकारच्या फॅन्सी राख्या उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, नारंगी अशा भडक रंगाच्या राख्यांना जास्त मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनवीन राख्या बाजारात आल्या आहेत. लहान आणि मोठे हिरे असलेल्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

चंदन राखी, डायमंड राखी, मोती राखी, कुंदन राखी, अशा प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. काही दुकानांमध्ये राखी बनविण्याचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून आले. विविध रंगी धाग्यात हिरे, मणी ओवून आकर्षक राख्या तयार करण्यात येत आहेत. सुंदर व नाजूक डिझाइन असलेल्या राख्यांची खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती जास्त असून डायमंड प्रकारातील राख्यांना जास्त मागणी आहे.

विविध प्रकारचे मणी, खडे, यांचा वापर करून तयार केलेल्या गोंड्याची राखी खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.दरवेळी नव्या प्रकारची राखी घेण्याकडे महिलावर्गाचा कल असतो. अशा चोखंदळ महिलांसाठी वैविध्यपूर्ण राख्यांच्या डिझाईनही उपलब्ध आहेत. बाजारपेठेत साधारण पाच रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत किमतीच्या राख्या आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा 25 ते 30 टक्क्यांनी किमतीमध्ये वाढ झाली असल्याने सामान्यांच्या खिशाला थोडा भुर्दंड पडणार आहे.

यंदा नवीन काय?

पुष्पा राखी : दुकानामध्ये यावेळी पुष्पा सिनेमाची छाप राख्यांवर पडलेली दिसून येत आहे.
पपेट राखी : लहान मुलांसाठी दरवर्षी कार्टुन्स आणि लायटिंगच्या राख्या असतात. यावर्षी पपेट हा नवीन प्रकार उपलब्ध झाला आहे. ही राखी लवचिक रबरापासून बनविली असल्याने मुलांना राखी आणि खेळणे असे एकात दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत.
चंदन राखी :  चंदन राखी हा देखील नवीन पर्याय बाजारात दाखल झाला आहे. यामध्ये रंगीत धाग्यामध्ये चंदनाचे मणी, कुदन, क्रिस्टल यांचा वापर करून राखी बनविली जाते. चंदनापासून बनविल्यामुळे हिला चंदनाचा सुगंध आहे.
लुम्बा राखी :  मारवाडी किंवा गुजराती समाजात नणंद भावजईला राखी बांधली जाते ती लुम्बा राखी. या राखीमध्ये तर हवेे तितके प्रकार आपल्याला मिळतील. आता केवळ फॅशन म्हणूनही मुली वापरतात,त्यामुळे लुम्बालाही बाजारात मागणी वाढली आहे. या राख्या खासकरुन लटकन या प्रकारातील असतात. यात मणी, क्रीस्टल यांचा सुरेखरित्या वापर केला जातो. तसेच लोकरीचादेखील आकर्षकरित्या वापर केलेला पाहायला मिळतो.
बेस्ट ब्रो  ..डॅशिंग ब्रो राखी
यंदा बेस्ट ब्रो.. डॅशिंग ब्रो अशी बिरुद मिरवणार्‍या राख्या पाहायला मिळत आहे. लाकडाच्या आकर्षक तुकड्यांवर बेस्ट ब्रो.. , डॅशिंग ब्रो, टीकटॉकवाला ब्रो आदी अक्षरे लिहिलेल्या या राख्या यंदा बाजारात आल्या आहेत. तरूणींचा या राखीला प्रतिसाद आहे.

Back to top button