पुणे : ‘ईक्यूजे कोर्ट’वर मिळतेय महसुली दाव्यांची माहिती | पुढारी

पुणे : ‘ईक्यूजे कोर्ट’वर मिळतेय महसुली दाव्यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जमीनविषयक दाव्यांच्या माहितीसाठी ‘ईक्यूजे कोर्ट’ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्यावर तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त या महसूल अधिकार्‍यांकडील दाव्यांची माहिती मिळत आहे.
तसेच दाव्याचा निकाल लागल्यानंतर निकालाची प्रतही अपलोड केली जात आहे.

जमिनीचा वाद, वारस नोंद, सातबार्‍यावर नावनोंदणी, इतर हक्कातील नाव कमी करणे, कूळ कायदा नोंद, फेरफार रद्द करणे, जमिनीवरील शासकीय बोजा रद्द करणे, अशा अनेक प्रकरणांसाठी मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, अप्पर विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव यांच्याकडे दाद मागितली जाते. महसूल अधिकार्‍यांकडे महिन्याला सरासरी 250 ते 300 अपिलांची सुनावणी होते.

अर्जदाराला संबंधित दाव्यावर पुढील सुनावणीची माहिती घेण्यासाठी संबंधित महसूल अधिकार्‍यांच्या कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात. त्यासाठी शेतकर्‍याला गावावरून या कार्यालयांमध्ये यावे लागते. अधिकार्‍यांची अनुपस्थिती किंवा
इतर कारणांमुळे अनेकदा पुढची तारीख दिली जाते. परिणामी, पक्षकारांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. परंतु, आता संकेतस्थळामुळे नागरिकांची ही गैरसोय दूर होत आहे.

Back to top button