पुणे : खबडी परिसरातील धबधब्यांची पर्यटकांना भुरळ | पुढारी

पुणे : खबडी परिसरातील धबधब्यांची पर्यटकांना भुरळ

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उंचखडक (ता. जुन्नर) खबडी डोंगरदर्‍यातील धबधबे पावसाने खळाळून वाहत आहेत. आनंद लुटण्यासाठी पर्यटक आणि ट्रेकर्सचा ओघ वाढला आहे.

उंचखडक (खबडी) परिसर निसर्गसौंदर्याची अलौकिक देण आहे. काही दिवसांपासून रिमझिम कोसळणार्‍या पावसामुळे खबडी शिवारातील आनंदवन तलाव भरला असून, काळभैरवनाथ मंदिर परिसरातील धबधबेही शतजलधारांनी कोसळत आहेत. पर्यटकांना हे प्रपात साद घालत आहेत.

राजुरीपासून उत्तरेला अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उंचखडक (खबडी) परिसरातील डोंगरावरील धबधबा पांढर्‍याशुभ्र जलधारांनी ओसंडून वाहत आहे. परिसरात काळभैरवनाथ मंदिर, आनंदवन तलाव आदी पर्यटनस्थळे असून त्यातील हरीण, काळविटाचे कळप, मोर, लांडगे, कोल्हे अन्य वन्यजीव तसेच फेसाळणारे धबधबे व हिरवाई पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

पर्यटकांनी कसे जावे?

पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथे आल्यानंतर कल्याण-अहमदनगर महामार्गाने अहमदनगरच्या दिशेने सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरी गावात यावे लागेल. नंतर राजुरीच्या उत्तरेला असलेल्या उंचखडक गावात यायचे, तेथे आल्यानंतर खबडी डोंगरावर निसर्गसौंदर्य नजरेस पडते.

Back to top button