पुणे: सिंहगड घाट रस्त्यावर सुरक्षेसाठी सूचना फलक | पुढारी

पुणे: सिंहगड घाट रस्त्यावर सुरक्षेसाठी सूचना फलक

खडकवासला : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर कोसळणार्‍या धोकादायक दरडी, तसेच किल्ल्याच्या बुरुजाच्या परिसरात सूचना फलक उभे करण्याचे काम सोमवारी (दि. 18) सुरू केले.
दरड, मधमाश्यांचे पोळ, उन्मळलेले कडे, बुरुज अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक नसल्याने पर्यटकांना तेथील माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. कडा कोसळून एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला, तर मधमाश्यांच्या हल्ल्यात वीस पर्यटक जखमी झाले होते. याबाबत दैनिक ‘पुढारी’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक प्रदीप पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्या देखरेखीखाली सोमवारी दिवसभरात घाट रस्त्याच्या दरडीच्या, तसेच इतर धोकादायक ठिकाणी माहितीचे फलक उभे करण्यात आले. उर्वरित फलक दोन दिवसांत उभे करण्यात येणार आहेत. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके, वनरक्षक बाबासाहेब जिवडे यांच्यासह सुरक्षा रक्षक, मजुरांच्या साहाय्याने सिंहगडाच्या डोणजे, गोळेवाडी व अवसरवाडी घाट रस्त्याच्या मार्गावरील धोकादायक दरडी, अरुंद वळणे, खोल दर्‍या अशा ठिकाणी सूचना फलक उभे करण्यात आले.

वनरक्षक बाबासाहेब जिवडे म्हणाले, ‘वन व्यवस्थापन समितीच्या निधीतून सूचना फलक उभे करण्यात येत आहेत. धोकादायक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहे, तसेच प्लॅस्टिक, मांसाहार, धूम्रपान बंदी, पाळीव प्राण्यांना मनाई असल्याने पावित्र्य रक्षणासाठी पाळीव प्राण्यांना मनाई आहे, तशा मजकुराचे फलक आहेत.’

Back to top button