भीमाशंकर : आदिवासी भागात भातखाचरांचे नुकसान | पुढारी

भीमाशंकर : आदिवासी भागात भातखाचरांचे नुकसान

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोर्‍यातील भातखाचरांचे बांध मुसळधार पावसामुळे फुटल्याने आदिवासी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातरोपांची व फुटलेल्या बांधांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी भातशेतीचे आगार समजली जातात. भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. 5100 हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते.

चालू वर्षी आदिवासी बांधवांनी रोहिणी व मृग नक्षत्रात काही ठिकाणी धुळवाफेत, तर काही ठिकाणी चिडवाफेत भाताच्या पेरण्या केल्या होत्या. चालू वर्षी रोहिणी, मृग कोरडे गेल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले होते. परंतु, आर्द्रा नक्षत्रात पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला होता. भातरोपे चांगल्या प्रकारे तरारून लागवडीयोग्य झाली होती. लागवडी सुरू होताच या भागामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे भातरोपे पाण्याखाली गाडून गेली. काही ठिकाणी भातखाचरांचे बांध फुटले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, निगडाळे, तेरुंगण, राजपूर, तळेघर, फलोदे, पाटण, पिंपरी, आहुपे, आसाणे, तिरपाड, डोण, अघाणे, चिखली, जांभोरी, मेघोली, साकेरी, माळीण, अडिवरे, पंचाळे, बोरघर, फुलवडे या परिसरामध्ये भातखाचरांचे बांध फुटल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आहुपे येथील सीताराम मोतीराम कुडेकर यांच्या भातखाचरांचा बांध फुटून मोठे नुकसान झाले.

 

Back to top button