पुणे : विद्यार्थी साहायक समितीचे प्रवेश सुरू; गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा | पुढारी

पुणे : विद्यार्थी साहायक समितीचे प्रवेश सुरू; गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्यात उच्च शिक्षणासाठी येणार्‍या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास, भोजनाची सोय विद्यार्थी साहायक समितीच्या वसतिगृहामध्ये करण्यात येते. समितीच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (ता. 15) सुरू झाली आहे. विद्यार्थी साहायक समिती ही संस्था गेली 67 वर्षे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे कार्य करीत आहे. संस्थेची पाच सुसज्ज वसतिगृहे असून, सुमारे 450 विद्यार्थी आणि 320 विद्यार्थिनी येथे राहतात. बारावीनंतर विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश झाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल.

प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहाटे योगासने, कमवा व शिका योजनेत सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्व विकासाच्या विविध उपक्रमात सहभाग अनिवार्य असतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडल्याचे माजी विद्यार्थी सांगतात. समाजातून मिळणार्‍या आर्थिक मदतीवरच इतकी वर्षे हे काम सुरू आहे. गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींनी संस्थेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक 15 जुलैपासून ऑनलाइन www.samiti.org या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Back to top button