पुणे : पावसाळी लाइनअभावी पाण्याचा लोंढा रस्त्यावर; वडगाव, नर्‍हेतील स्थिती | पुढारी

पुणे : पावसाळी लाइनअभावी पाण्याचा लोंढा रस्त्यावर; वडगाव, नर्‍हेतील स्थिती

धायरी : पुढारी वृत्तसेवा: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वडगाव बुद्रुक व नर्‍हे येथील सेवारस्त्याच्या कडेला पावसाळी लाइनच टाकलेली नाही. त्यामुळे पावसाचे सर्व पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अर्ध्यावर रस्ता पाण्याने ओढ्यासारखा भरून वाहत आहे. रस्त्यावरून वाहणार्‍या पाण्यामुळे सर्व वाहनचालक व येथून जाणारे नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्याच्या कडेला मैलापाणी वाहून जाण्यासाठी लाइन टाकण्यात आल्या आहेत. परंतु, रस्त्यावरील पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाइनच टाकण्यात आली नाही.

त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यात पाण साचत आहे. साहजिकच पाण्याखाली खड्ड्यामध्ये वाहन आदळून अपघातही घडत असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकी घसरून अपघातही होत आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना येथून दुचाकी चालवणे मुश्कील झाले आहे. येथून जाताना पादचार्‍यांच्या अंगावर वाहनांचे पाणी उडते, त्यामुळे पादचारीही हैराण झाले आहेत. या त्रासातून सर्वांची सुटका होण्यासाठी या सेवारस्त्याच्या कडेला पावसाळी लाइन टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सारंग नवले यांनी केली आहे.

Back to top button