भामा आसखेड 73.56 टक्के भरले | पुढारी

भामा आसखेड 73.56 टक्के भरले

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा: मागील आठवड्यापासून होत असलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात 73.56 टक्के पाणीसाठा झाला आहे. संततधार सुरू राहिल्यास लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यात पश्चिम भागातील भामा आसखेड धरण 8.14 टीएमसी पाणीसाठा क्षमतेचे आहे. खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यांतील शेतीसह अनेक गावच्या पाणी योजना तसेच पुणे महानगरपालिकेच्या पूर्व भागातील नागरिकांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे धरण 100 टक्के भरणे महत्त्वाचे आहे.

धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, चर पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. भातखाचरांतून देखील पाणी वाहू लागले आहे. ओढे, नाले यांचे वाहून येणारे पाणी हे धरणाच्या जलसाठ्यात येत असल्याने लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी 667.47 मिलिमीटर झाली असून, धरणात एकूण पाणीसाठा 173.235 दशलक्ष घनमीटर झाला आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 159.713 दशलक्ष घनमीटर आहे. धरणसाखळीत आतापर्यंत 504 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात 73.56 टक्के पाणीसाठा म्हणजेच 5.64 टीएमसी पाणीसाठ्याची नोंद धरण प्रशासनाकडे झाली आहे.

Back to top button