22 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा | पुढारी

22 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 22 हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. महापालिकेच्या शाळांत सुमारे 96 हजार विद्यार्थी असून, यापैकी नियमितपणे येणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश आदी खरेदीकरिता ‘डीबीटी’ योजनेद्वारे पैसे दिले जातात. साधारणपणे इयत्तेनुसार दीड हजार ते चार हजार रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

ही रक्कम जमा होण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच विद्यार्थ्यांच्या खात्यात सर्व पैसे जमा झाले आहेत. सध्या शाळांत नियमितपणे येणार्‍यांची संख्या चाळीस हजार आहे. त्यापैकी बावीस हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने हे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. पुढील टप्प्यात उर्वरीत 18 हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असून, त्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे.

Back to top button