Rahul Gandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

Rahul Gandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तेथून ते लखनौ मार्गे थेट पुण्याला आले.
नियोजित वेळेपेक्षा त्यांच्या सभेला दोन तास उशीर झाला. तरी गर्दी मात्र त्यांची वाट पाहत थांबून होती. ते व्यासपीठावर आल्यानंतर जयघोष करीत नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तीन ते चार मिनिटांत सत्कार स्वीकारल्यानंतर गांधी थेट भाषणाला उठले. त्यांनी हल्ला  चढवला तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर.
मी खास या सभेसाठी आलो. राहुल गांधी यांनी न्याय मिळवून देण्यासाठी जी भूमिका घेतली आहे, ती मान्य करण्यासारखी आहे. सध्याच्या दूषित वातावरणात द्वेष आणि अहंकार बघायला मिळतोय. विरोधक खोटे बोलण्यात पटाईत आहेत.
– विजय मचाले, नागरिक.
पुण्यात जेव्हा इंदिरा गांधी आल्या होत्या, तेव्हाही मी त्यांच्या सभेला आलो होतो. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या सभेला आलो आहे. देशातील पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वक्तव्याने दुःखी होतोय. काँग्रेसकडून अपेक्षा आहे की, सर्व जाती-धर्माचे लोक एकाजीवाने राहिले पाहिजेत. हा देश सर्व जातीधर्माचा आहे.
– शादुल्ला खान, नागरिक.

नागरिकांचा  मेट्रोने प्रवास

सभेचे मैदान हे मेट्रो स्टेशनच्या जवळ असल्याने अनेक पुणेकरांनी सभास्थळी पोहोचण्यासाठी वाहनांना फाटा देत मेट्रोचा वापर केला. काँग्रेसचा पंचा गळ्यात अडकलेल्या मंडळींनी मेट्रो फुल्ल भरून वाहत असल्याचे चित्र शुक्रवारी बघण्यास मिळाले.
हेही वाचा

Back to top button