पुणे : अपहरण करून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : अपहरण करून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

शिरूर, पुढारी वृत्तसेवा : भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून दरोडा टाकणार्‍या आरोपींना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे (रा. सोळू, ता. खेड), रेहान हसन मोहम्मद खान (वय 32, रा. करंदी रोड गॅस फाटा, शिक्रापूर), अमर दिगंबर दिवसे (वय 20, रा. आंबेडकरनगर, पूर्णा, परभणी), आकाश उर्फ डुब्या सोपान पानपट्टे (रा. पूर्णा, परभणी), इमरान अजीमुल्ला खान (वय 30, रा. गॅस फाटा, खालसा ढाब्याजवळ, शिक्रापूर), मारी उर्फ सूरज नागसिंध खंदारे व एक अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर असे की, शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील भंगार व्यावसायिक नसीर अबुबकर खान (वय 19, रा. गॅस फाटा, शिक्रापूर) यांचे अज्ञात व्यक्तींनी स्विफ्ट डिझायर कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले होते. यावेळी खान यांच्या खिशातील रोख 57 हजार रुपये व एक मोबाईल फोन असा एकूण 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला होता व त्यांना पहाटेच्या सुमारास अज्ञातस्थळी सोडून दिले होते.

या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलविली. हा गुन्हा करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर या पथकाने करण कांबळे यास फुलगाव परिसरातून पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा रेहान हसन मोहम्मद खान, अमर दिगंबर दिवसे, आकाश उर्फ डुब्या सोपान पानपट्टे, इमरान अजीमुल्ला खान, मारी उर्फ सूरज नागसिंध खंदारे व एक अल्पवयीन मुलगा यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

या वेळी पोलिसांनी इतर आरोपींना तुळापूर रोड चिंचबन हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, पोलिस हवालदार राजू मोमीन व पथकाने केला.

Back to top button