पुणे : पावसाने भोरमध्ये ‘कही खुशी कही गम’ | पुढारी

पुणे : पावसाने भोरमध्ये ‘कही खुशी कही गम’

भोर, पुढारी वृत्तसेवा : गेले आठ ते दहा दिवसांपासून सलग बरसत असणार्‍या पावसाने भोर तालुक्यात काही शेतकरी खुशीत, तर काही चिंताग्रस्त झाले आहेत. भातखाचरे भरल्याने भात उत्पादक आनंदात आहेत, तर अन्य पिके पाण्यात गेल्याने ते शेतकरी चिंतेत आहेत. एकूणच तालुक्यात ‘कही खुशी-कही गम’ असे चित्र आहे.

सलग बरसणार्‍या पावसामुळे बहुतांश कडधान्य पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. दुसरीकडे भात खाचरांना तळ्याचे स्वरूप आले आहे. संततधारेने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने केलेल्या पुनरागमनानंतर भोर तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आठ दिवस सलग जोरदार कोसळत असलेल्या जलधारांमुळे आता हजारो हेक्टरवरील कडधान्य पिके पाण्याखाली जाऊन सडून चालली आहेत. तसेच रखडलेल्या कडधान्याच्या पेरण्या करण्यासही वाफसा मिळत नसल्याने हंगामाची चिंता लागली आहे. भात पीक जोमात, तर कडधान्य पीक कोमात जात असल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली आहे.

तालुक्याचा पश्चिम पट्टा, तर पावसाने चांगले झोडपून काढले आहे. अनेकांच्या भात खाचरांच्या ताली पडल्या असून, लावणीयोग्य झालेले भात रोप गाळमातीत गाडून गेले आहे. यामुळे भात लागण कशी करायची, या चिंतेत शेतकरी आहेत.

दुबार पेरणीचे संकट ओढवणार

अतिवृष्टीमुळे सर्वच कडधान्य पिके गेले आठ दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. ही पिके सडून चालली असून, ती वाया जाणार असल्याने दुबार पेरणीचे संकट येणार आहे, असे धावडी (ता. भोर) येथील प्रगतिशील शेतकरी विलास राऊत यांनी सांगितले.

Back to top button