कुकडीत 12 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा; केवळ दोन दिवसांत पाणीसाठा दुप्पट | पुढारी

कुकडीत 12 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा; केवळ दोन दिवसांत पाणीसाठा दुप्पट

जुन्नर : पुढारी वृतसेवा: कुकडी प्रकल्पांतर्गत येणार्‍या धरण साखळीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवारअखेर (दि.14) प्रकल्पात 12.54 टीएमसी (42.27 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. मागीलवर्षी या दिवशी केवळ 5.36 टीएमसी (18.06) टक्के पाणीसाठा होता. केवळ दोन दिवसांत पाणीसाठा दुपटीने वाढला आहे. अद्यापही पावसाचा जोर असून, काही दिवसांतच शृंखलेतील धरणे तुडुंब भरणार आहेत.

वडज धरणाच्या सांडव्यावरून 1161 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. येथील मीना पूरक कालव्यातून 200 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. येडगाव धरणातून 1001 क्युसेक, चिल्हेवाडीहुन 3347 क्युसेकने पाणी येडगाव धरणाकडे सोडले जात आहे. यंदा पावसाचे आगमन थोडे उशिरा झाल्याने जून महिन्यात शेतकरी चिंतेत होता, मात्र गेल्या एका आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने आता समाधान व्यक्त करीत आहे. मागील वर्षी पाणीसाठा कमी असतानाही पाटबंधारे विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे कोठेही पाण्याचा तुटवडा जाणवला नव्हता.

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा
टीएमसी टक्केवारी पाऊस मिलिमीटरमध्ये
डिंभे 4.76 38.15 548
माणिकडोह 4.13 40.58 723
वडज 0.77 65.90 363
येडगाव 1.63 83.66 437
पिंपळगाव जोगे 1.25 32.06 603
चिल्हेवाडी 0.62 76.55 315

Back to top button