इंधन दर आणखी कमी करावेत; अजित पवार यांची सूचना | पुढारी

इंधन दर आणखी कमी करावेत; अजित पवार यांची सूचना

धनकवडी; पुढारी वृत्तसेवा: ‘पेट्रोल व इंधनाचे दर तुटपुंजे कमी केले आहेत. पेट्रोलचे दर केवळ पाच आणि डिझेलचे तीन रुपयांनी कमी केले. सरकार बदलले, आम्ही काहीतरी करतो आहे, ते दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला आहे,’ असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी सांगितले. पवार म्हणाले, ‘सध्याचे सत्ताधारी नेते पूर्वी विरोधी पक्षात असताना त्यांनी राज्याचा कर 50 टक्के कमी करण्याची मागणी करीत होते. तसे केले असते, तर पेट्रोलचे दर 18 रुपये, तर डिझेल 11 रुपयांनी कमी झाले असते.’ ‘मी अर्थमंत्री असताना कर कमी करून सरकारने एक हजार कोटी रुपयांचा भार उचलला.

सीएनजीचे दर वाढले आहेत, त्यामुळे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. राज्यताील शेतकर्‍यांना बियाणे पुरविले पाहिजेत. शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. सरकारने भरीव मदत करण्याची वेळ आलेली आहे.’ सध्या दोघांवरच कॅबिनेट चालले आहे, असे सांगून पवार म्हणाले, ‘165 आमदारांचे पाठबळ असताना मंत्रिमंडळ विस्तार का रखडला आहे, हे कळलं पाहिजे. राज्याचा कारभार गतीने होण्याकरिता काम केलं पाहिजे.’ ‘ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा. मध्यवर्ती निवडणुका लागणार नाहीत. केसरकर प्रवक्ते झाले असले, तरी त्यांनी अभ्यास करून बोलावे,” असे पवार यांनी अन्य प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

Back to top button