कुटुंब झोपेत अन् भिंत कोसळली | पुढारी

कुटुंब झोपेत अन् भिंत कोसळली

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार, संततधार पाऊस सुरू असताना अनेक दुर्घटना घडत आहेत. असेच शिक्रापूर (ता. शिरूर) येथेदेखील एका घराच्या शेजारची भिंत घरावर कोसळल्याने पत्र्याच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंब बचावले असून, घरगुती साहित्यांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (दि. 12) पहाटेच्या सुमारास घडली. शिक्रापूर येथील कोयाळी पुनर्वसन येथील काळूराम सोनवणे हे त्यांची पत्नी, तीन मुली, एक मुलगा यांच्यासह घरात झोपलेले होते. बाहेर संततधार पाऊस सुरू होता. कुटुंब गाढ झोपेत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे शेजारील घराची भिंत सोनवणे यांच्या घरावर कोसळली. यामुळे सोनवणे यांच्या घराची भिंतदेखील झोपलेल्या व्यक्तींच्या अंगावर कोसळली.

या वेळी सर्व जण खडबडून जागे झाले. सुदैवाने या वेळी घरात झोपलेल्या तीन मुली व एक मुलगा भिंतीच्या विरुद्ध बाजूला झोपलेले असल्याने बचावले. मात्र, काळूराम सोनवणे, त्यांची पत्नी ज्योती सोनवणे व आई देऊबाई सोनवणे हे किरकोळ जखमी झाले. घरातील दैनंदिन वापराचे साहित्य भिंतीखाली गाडले गेल्याने सोनवणे कुटुंबीयांचे नुकसान झाले. सोनवणे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शासनाने त्यांना मदत द्यावी, अशी मागणी काळूराम सोनवणे यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, त्रिनयन कळमकर यांनी घटनास्थळी भेट देत सोनवणे कुटुंबीयांची भेट घेत त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

कोयाळी गावठाण येथे सोनवणे कुटुंबीयांच्या घराची भिंत पडल्याची माहिती मिळालेली आहे. या घटनेचा तातडीने पंचनामा करून तो वरिष्ठ कार्यालयास पाठवत आहे.

                                             – सुशीला गायकवाड, तलाठी, कोयाळी

Back to top button