जि. प., पंचायत समित्यांचा प्रशासक कालावधी वाढला; दोन महिन्यांची मुदतवाढ | पुढारी

जि. प., पंचायत समित्यांचा प्रशासक कालावधी वाढला; दोन महिन्यांची मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवरील प्रशासक कालावधीत दोन महिन्यांनी वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकार्‍यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या हाती आणखी काही महिने कारभार असणार आहे. पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांसह 293 पंचायत समित्यांच्या प्रशासकपदाची मुदत 13 जुलैला संपुष्टात आली; तसेच 25 जिल्हा परिषदांची मुदत 20 जुलैला संपुष्टात येणार आहे.

त्यामुळे ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांच्या प्रशासकांना आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ग्रामविकास विभागापाठोपाठ पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतंत्र आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांवरील प्रशासकांना दोन महिन्यांची मुदतवाढ देत कर्तव्य पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्हा परिषदांची 21 मार्च तसेच पंचायत समित्यांची 13 मार्च रोजी मुदत संपुष्टात आली होती.

त्यानुसार, राज्यातील 25 जिल्हा परिषदा, तसेच 293 पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे राज्याच्या ग्रामविकास विभागाने या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पदाधिकारी निवड होईपर्यंत जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना 20 मार्चपासून 20 जुलैपर्यंत चार महिन्यांची मुदतवाढ दिली. तसेच पंचायत समित्यांच्या प्रशासकांनाही 13 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती, आता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

Back to top button