पुणे : बनावट नियुक्तीपत्राद्वारे नोकरी; चौघांविरोधात गुन्हा | पुढारी

पुणे : बनावट नियुक्तीपत्राद्वारे नोकरी; चौघांविरोधात गुन्हा

बारामती : पुढारीवृत्तसेवा : हजेरीपत्रक, पगारपत्रक, सेवापुस्तकामध्ये खोट्या व बनावट नोंदीचे कागदपत्र तयार करून तसेच बनावट नियुक्तीपत्राद्वारे नोकरी करत संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संदीप हनुमंत गाडेकर (रा. चोपडज) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रामचंद्र नारायण भंडलकर (वय 61, रा. चोपडज), पुष्पलता निवृत्ती दिसले (लग्नानंतरचे नाव – पुष्पलता बाळासाहेब जगताप), रमेश विठ्ठल भोसले (रा. कानाडवाडी, ता. बारामती) व एक अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. 18 फेब्रुवारी 1997 ते 11 जुलै 2022 या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, पांढरवस्ती, चोपडज येथे हा गुन्हा घडला. यातील भंडलकर, भोसले हे संस्थेतून निवृत्त झाले आहेत. आरोपींनी 18 फेब्रुवारी 1997 ते 25 एप्रिल 1997 या कालखंडामध्ये या शाळेत नोकरी केलेली नसताना हजेरीपत्रक, पगारपत्रक, सेवापुस्तकामध्ये खोट्या व बनावट नोंदी तयार करून शासनाची फसवणूक करून एकाच वेळी दोन ठिकाणाहून पगार मिळविला.

25 एप्रिल 1997 नंतर दिसले याची यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ, कानाडवाडी या संस्थेची नियुक्ती नसताना शिक्षणाधिकारी यांची कोणतीही मान्यता नसताना शासनाची फसवणूक करत आजअखेर बोगस नोकरी करत पगार मिळविला. त्यांनी फिर्यादी व विद्यार्थ्यांचा विश्वासघात केल्याचा दावा फिर्यादीने दाखल केला होता. बारामती न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

Back to top button