पुणे : धरण क्षेत्रात दमदार; एक हजार क्युसेकने रात्री 12.40 ला विसर्ग सुरू | पुढारी

पुणे : धरण क्षेत्रात दमदार; एक हजार क्युसेकने रात्री 12.40 ला विसर्ग सुरू

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. मागील 24 तासांत धरणसाठ्यात तब्बल 1.28 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे शहराला महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत 0.84 टीएमसी पाणीसाठा जास्त झाला आहे. मुसळधार पावसामुळे पाणीकपातीचे संकट तूर्तास दूर झाले असून, पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, साखळी धरणातून 1000 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणसाखळीत आठ दिवसांपूर्वी मृत पाणीसाठा म्हणजे 2.85 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. त्यामुळे पुणेकरांवर एकदिवसाआड पाण्याची नामुष्कीदेखील ओढवली. मात्र, पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाली, ती कायम असल्याने आठवडाभरात तब्बल 6.10 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

धरणसाखळीतील खडकवासला धरण वगळता इतर तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरूच होता. खडकवासला धरण क्षेत्रात 18 मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात 85 मि.मी., वरसगाव धरण क्षेत्रात 74 मि.मी., तर टेमघर धरण क्षेत्रात 75 मि.मी पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला 22 मि.मी., पानशेत 84 मि.मी, वरसगाव 75 मि.मी, तर टेमघर धरण क्षेत्रात 60 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत तब्बल 9.47 टीएमसी म्हणजे 32.48 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

दहा दिवसांत धरण निम्मे भरले

जून महिना संपला, तरी जिल्ह्यात, पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नसल्याने पुणेकरांपुढे पाणीकपातीचे संकट उभे ठाकले होते. जून महिनाअखेरीस खडकवासला धरणात सर्वाधिक कमी 0.28 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे अवघा 20 टक्के पाणीसाठा होता, परंतु जुलै महिन्याच्या सुरवातीला जोरदार पाऊस सुरू झाला. ती संततधार कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरण अवघ्या दहा दिवसांत निम्म्याहून अधिक भरले आहे. खडकवासला धरण क्षेत्रात 1.49 टीएमसी पाणीसाठा झाला असून ते 75.60 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मुठा उजवा कालव्यात 1005 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

Back to top button