पिंपरीत संततधारा; पावसाने शहरवासीय गारठले | पुढारी

पिंपरीत संततधारा; पावसाने शहरवासीय गारठले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.11) दिवसभर संततधार सुरू होती. आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने शहरवासीय गारठले आहेत. शहरात सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सोमवारी झालेल्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडणार्‍यांना ओलेचिंब करुन टाकले. शहरालगत असलेल्या मावळ भागात दोन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील पवना व इंद्रायणी नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. शहरात पावसाचा जोर वाढला असून रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे पादचार्‍यांची चालताना कसरत होत होती.

कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक आज छत्री व रेनकोट असूनही अर्धे भिजले होते. पावसामुळे आज रस्त्यावरील भाजी विक्रेते आणि टपरी, पथारीवाल्यांचे हाल झाले. सामानाची आवराआवर करताना त्यांची तारांबळ होत होती. नेहमी गजबजलेल्या पिंपरी बाजारपेठेत देखील पावसामुळे नागरिकांची वर्दळ कमी होती. बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणार्‍या नागरिकांना बसशेड अपुरे पडत होते. काही ठिकाणी बसथांब्याजवळ पाणी साचल्याने प्रवाशांना उभे रहायला जागा नव्हती. अशावेळी नागरिकांनी पर्यायी रिक्षाचा वापर केला.

जवळ रेनकोट व छत्री नसलेले नागरिक बांधकाम, दुकाने याठिकाणी आडोसा घेवून ताटकळत उभे होते.शहरातील ग्रामीण व उपनगरात देखील इंद्रायणी नदीला पुर आल्याने चर्होलीतील प्रतापेश्वराचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. शहरातील गटारे आणि नाले देखील तुडुंब भरून वाहत होते. नाल्यांना देखील नदीचे स्वरुप आले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहन चालकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पवनानदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदी काठच्या घरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Back to top button