29 हजार किलो भुईमूग; 3 लाख किलो रताळी आषाढीसाठी | पुढारी

29 हजार किलो भुईमूग; 3 लाख किलो रताळी आषाढीसाठी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील तरकारी विभागात चार दिवसांत 29 हजार 500 किलो भुईमूग शेंग, 3 लाख 16 हजार 500 किलो रताळी व 100 वाहनांमधून केळींची आवक झाली. घाऊक बाजारात रताळींच्या दहा किलोला 200 ते 350, भुईमूग शेंगला 300 ते 400 रुपये तर केळी प्रतिकिलोला 16 ते 66 रुपये दर मिळाला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात मागील चार दिवसांत भुईमूग शेंगाची 29 हजार 500 किलोंची आवक झाली. मागील दोन दिवसांपासून पावसाच्या संततधारेमुळे भुईमूग शेंगाला माती लागण्याचे प्रमाण जास्त होते. बाजारात आवकेच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने भुईमुगाच्या शेंगांना चांगला दर मिळाला.

मार्केटयार्डात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगावसह इतर काही गावांतून रताळींची आवक झाली. गतवर्षीच्या तुलनेत पुणे विभागातून यंदा गावरान रताळ्यांची मोठी आवक राहिली. त्या तुलनेत मागणीही चांगली असल्याने रताळींच्या किलोच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, यंदा कर्नाटकातील स्थानिक बाजारपेठांमध्ये रताळ्यांना चांगला दर मिळाला. परिणामी, कर्नाटकातील शेतकर्‍यांनी पुण्याच्या बाजारपेठेकडे पाठ फिरविली त्यामुळे एरवीपेक्षा कर्नाटक रताळ्यांची आवक निम्म्यावर आल्याचे अडतदार अमोल घुले यांनी सांगितले.

पुणे विभागातील सोलापूर, अकलूज, इंदापूरसह कर्नाटक, तामिळनाडू येथून गावरान व सोनकेळी दाखल झाली. मागील चार दिवसांत दररोज सरासरी 21 ते 25 वाहनांमधून केळींची आवक राहिली. घाऊक बाजारात या काळात केळींच्या प्रतिकिलोला 16 ते 66 रुपये तर किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये दर मिळाला. लॉकडाऊन काळात मागणी अभावी केळीला कमी दर मिळाल्यामुळे शहराला मोठ्या प्रमाणात केळी पुरवठा करणार्‍या भागात केळीच्या लागवडीत मोठी घट झाली. दरम्यान, दर्जेदार केळ्यांच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी, यंदा मार्केट यार्डात केळ्यांची आवक कमी व मागणी जास्त राहिल्याचे केळ्याचे व्यापारी अनिकेत वायकर यांनी सांगितले.

Back to top button